मुंबई : रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या महाविकास आघाडीने कडवी झुंज देत यश मिळवले. महायुतीला मोठा देत अनेक प्रतिष्ठित मतदारसंघाची लढाई जिंकली. यानंतर सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला असून मराठा आरक्षणावरुन घेरले आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये दूषित वातावरण निर्माण करण्याचं काम हे महाविकास आघाडीने केल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
आरक्षणाचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी
माध्यमांशी संवाद साधताना आपण महायुतीसोबत कायम असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, “शरद पवार यांनी 60 वर्षे मराठ्यांना चुना लावण्याचं काम केलं. पण चुना लावणारा माणूस यावेळी यशस्वी झाला ही गोष्ट नाकारुन चालणार नाही. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि त्यांचा सगळा कंपू हे आता मनोज जरांगे पाटलांना कामाला कामाला लावणार आहेत. मनोज जरांगे यांचे आंदोलन आता विधानसभा निवडणुकीपर्यंत चालेल. आरक्षणाचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी शरद पवार करत आहेत. शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटलांना लिहून द्यावं की, त्यांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आम्ही 10 टक्के ओबीसीमध्ये आरक्षण देऊ. जरांगे फॅक्टरचा सुद्धा महायुतीला तोटा झाल्याचे झाला. त्याचबरोबर कांदा प्रश्न दूध व सोयाबीनचा प्रश्न देखील महायुतीला महागात पडले,” असे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
इंडिया आघाडी ही लुटारूंची टोळी
पुढे त्यांनी महायुतीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. सदाभाऊ खोत म्हणाले, “महायुतीमधील आमच्या सगळ्या घटकपक्षांनी प्रमाणिकपणाने लोकसभेच्या निवडणुकीचं काम केलं. या महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने घेऊन जाणारे नेतृत्व देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या नेतृत्वाची गरज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आहे. देशाला विकासाच्या वाटेवरून घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून आज संपूर्ण देश आणि जग नरेंद्र मोदी यांच्याकडे बघत आहे. इंडिया आघाडी ही खऱ्या अर्थाने लुटारूंची टोळी आहे. ही टोळीवाल्यांची आघाडी आहे. आमची लढाई भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. भारतातली कष्ट करणारी जनता यांना घेऊन आम्ही लढत आहोत. या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं अनेक बागुलबुवा निर्माण केले गेले. त्याचाही परिणाम या निवडणुकीवर झाला,” असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.