मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (J. P. Nadda) हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकींपूर्वी भाजप अध्यक्षांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. राज्यातील राजकारणामध्ये जे.पी. नड्डा यांच्या दौऱ्याची चर्चा असताना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जे.पी. नड्डा यांच्या मुंबईदौऱ्यावर राऊत यांनी जहरी टीका केली असून सुप्रीम कोर्टाने तुमचं एवढं वस्त्रहरण करून सुद्धा तुमचा खोटारडेपणा चालूच आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या दौऱ्यावर टीका करताना ठाकरे गट खासदार संजय राऊत म्हणाले, जे. पी. नड्डा यांनी आवाहन केले की साधेपणाने जगा, महागड्या गाड्या, महागडे घड्याळ वापरू नका. पण 100 टक्के भाजप नेत्यांच्या हातात महागडी घड्याळ आहेत. 90 टक्के भाजप नेते परदेशी गाड्यातून फिरतात. मोदींच्या खिशात जो पेन आहे तो 25 लाखाचा आहे, मोदींच्या हातातील घड्याळाची किंमत काढा…मोदींचा सूट दहा ते पंधरा लाखाचा आहे, मोदींचे विमान ते खास वीस हजार कोटीचे विमान आहे. मोदींचे सगळेच मित्र अब्जाधीश आहेत, गरीब नाहीत. सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका. मोदी करत आहे तसे ढोंग करा असे नड्डा सांगत आहेत, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले, तुम्ही एका बाजूला शेतकऱ्यांची हत्या करत आहात, गरिबीची थट्टा करत आहात. आमदार, खासदारांना 50-50 कोटी देऊन सरकार बनवत आहेत. मात्र ही जी शाही आहे ती लोकशाही राहील, हुकूमशाही जाईल. राजकीय झुंडशाही यावर नड्डांना बोलावेसे वाटले नाही. जी लूट होत आहे, त्यावर मत व्यक्त करता आले नाही. नड्डांचे मत सर्वात आधी मोदींना लागू होते. इतकी श्रीमंती कुठल्याही पंतप्रधानांनी भोगली नव्हती. ही या देशाची लूट आहे. पीएम केयर घोटाळा यावर बोलत नाही. या फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात येऊन आम्हाला ज्ञान देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी मातीतलं राजकारण केलं आहे. खोक्यातील राजकारण केले नाही. असा घणाघात संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावर घणाघात केला आहे.