पुणे : सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतींची येत्या सोमवारी (दि १८) आणि मंगळवारी (दि १९) प्रतिष्ठापना होणार असून, यासाठी गणेश मूर्ती खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने शहरातील वाहतूकीत बदल केला आहे. हा बदल सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
गणेशोत्सव सुरू झाला आहे. गणेशमूर्ती विक्रीचे बहुसंख्य स्टॉल हे डेंगळे पूल ते शिवाजी पुलादरम्यान श्रमिक भवनासमोर (आण्णाभाऊ साठे चौक) व कसबा पेठ पोलीस चौकी ते जिजामाता चौक ते मंडई तसेच सावरकर पुतळा ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रोड) पर्यंत आहेत. या परिसरात गणेशमूर्तींची खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक सुरक्षित व सुरळीत चालण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
दोन दिवस शिवाजी रोड गाडीतळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग – गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळण घेऊन संताजी घोरपडे पथावरून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे.
शिवाजीनगरकडून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून डावीकडे वळण न घेता सरळ जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक, टिळक चौक मार्गा टिळक रोडने जावे.
झाशीची राणी चौक ते खुडे चौक ते डेंगळे पूलमार्गे कुंभारवेसकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी खुडे चौकामधून म.न.पा. पुणे समोरून मंगला सिनेमा लेन मधून कुंभारवेस किंवा प्रीमिअर गॅरेज चौक शिवाजी पूल मार्गे गाडगीळ पुतळा चौक तसेच डावीकडे वळण घेऊन कुंभारवेस चौक या मार्गाचा वापर करावा.
सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रोड)
गणपती विक्री दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरु राहील. मात्र, या टप्प्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाहने पार्क करता येणार नाहीत.
वाहन पार्किंग व्यवस्था
मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा
जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक रस्त्याचे डाव्या बाजूस
निलायम ब्रिज ते सिंहगड रोड जंक्शन
वाहतूक सुरू असलेले रस्ते
वाहतूक सुरु असलेल्या मार्गावरून केवळ एकेरी वाहतूक सुरु राहणार असून जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरुज
अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक
सोन्या मारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक
मंगला टॉकीजसमोरील प्रीमिअर गॅरेज लेनमधून कुंभार वेस
खरेदीस आलेल्यांसाठी पार्किंग व्यवस्था
गणेश मुर्ती खरेदीसाठी येणारे भक्त आणि सार्वजनिक मंडळांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. न्या. रानडे पथावर कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळा या दरम्यान रस्त्याचे कोर्टाकडील एका बाजूस.
वीर संताजी घोरपडे पथावर म.न.पा. बिल भरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौक या रस्त्याच्या दक्षिण बाजूस
टिळक पूल ते भिडे पूल दरम्यानचे नदीपात्रातील रस्त्यावर
मंडई येथील मिनर्व्हा व आर्यन पार्किंग तळावर
शाहू चौक (फडगेट चौकी चौक) ते राष्ट्रभूषण चौक, फक्त रस्त्याचे डाव्या बाजूस.
पीएमपीएमएल बसेसचा मार्ग
शिवाजीनगर स्टँडवरुन शिवाजीरोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या बसेस ह्या स.गो. बर्वे चौकातून शिवाजी पुलावरुन जाण्याऐवजी स.गो. बर्वे चौकामधून जंगली महाराज रोडने टिळक चौक मार्गे टिळक रोडने स्वारगेटकडे जातील.
कार्पोरेशन बसस्टॉप येथून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसेस ह्या झाशी राणी चौक मार्गे जंगली महाराज रोडने अलका टॉकीज चौक, टिळक रोड, शास्त्री रोडने स्वारगेटकडे जातील.