कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत पुणे विभागातील 23117 शेतकरी; सहकारमंत्र्यांनी केले 'हे' आवाहन
पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पुणे विभागातील २३ हजार ११७ पात्र शेतकऱ्यांचा या यादीत समावेश आहे. संबंधित शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
ही यादी जिल्हानिहाय आणि बँकनिहाय प्रसिद्ध करण्यात आली असून, संबंधित बँक शाखा, विकास संस्था तसेच ग्रामपंचायतींमध्येही ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची माहिती तपासून नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम तपासणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे, तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. बँकांनी योजनेच्या पोर्टलवर राज्यातील एकूण ३१ लाख १७ हजार थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. संगणकीय प्रक्रियेद्वारे निश्चित करण्यात आलेल्या १६ लाख ९६ हजार पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर १० हजार ११४ कोटी ९० लाख रुपये कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. यापैकी ७ ऑगस्ट रोजी ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २८ कोटी ६० लाख रुपये, तर २४ ऑगस्ट रोजी ६ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना ५ हजार ८६ कोटी ३० लाख रुपये वितरित करण्यात आले.
राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्जे निरंक करण्यात येणार आहेत.
तसेच योजनेतील पात्र मृत शेतकरी, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






