शब्दांचे सोने करणारा कवी आर्थिक विवंचनेत; पत्नीच्या उपचारांसाठी कर्जाचा डोंगर
हनुमंत चांदगुडे यांनी आपल्या लेखणीतून ग्रामीण महाराष्ट्राचे जगणे, शेतकऱ्यांच्या व्यथा आणि माणसांच्या भावविश्वाचे प्रभावी चित्रण केले आहे. ‘भेगा भुईच्या सांदताना’ या त्यांच्या काव्यसंग्रहाच्या सहा आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. ‘झाड व्हायचं दोघांनी’ या दीर्घकाव्याचा मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आहे. ‘आडतास’ या लोकलयीतील काव्यसंग्रहानेही साहित्यविश्वाचे लक्ष वेधले आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या ‘आळाशी’ या कवितेचा इयत्ता आठवीच्या बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात ‘लेक’ या गीताला, तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘किणकीण घुंगराची’ या कवितेला स्थान मिळाले आहे. याशिवाय, ‘आडतास’ या संपूर्ण काव्यसंग्रहाचा २०२६ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. त्यांच्या या काव्यसंग्रहाला अभ्यासक्रमात ५० गुणांचे स्थान असल्याचे सांगण्यात येते.
चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातही चांदगुडे यांच्या लेखणीचा ठसा उमटला आहे. चर्चेत असलेल्या ‘टीडीएम’ चित्रपटासह ‘संत सेना’, ‘गुलामी’, ‘विपरीत’, ‘तांडा’, ‘पाऊस’ आणि ‘हंबरडा’ या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या ‘सह्याद्री देवराई’ उपक्रमासाठीही त्यांनी गीते लिहिली आहेत. विविध वेबसिरीजची शीर्षकगीते, मालिकांचे शीर्षकगीत आणि लोकगीते त्यांच्या नावावर आहेत.
यशवंतराव सावंत जीवनगौरव पुरस्कार, गदिमा पुरस्कार, संत तुकाराम साहित्यरत्न पुरस्कार आणि राष्ट्रशाहीर अमर शेख राज्य पुरस्कार यांसह त्यांना एकूण ३३ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ‘कवी मुलांच्या भेटीला’ या उपक्रमातून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.
साहित्याच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या या कवीच्या आयुष्यात मात्र आर्थिक अडचणींचे सावट आहे. त्यांच्या प्रतिभेचा गौरव केवळ पुरस्कार आणि अभ्यासक्रमांपुरता मर्यादित न राहता, त्यांना प्रत्यक्ष मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातून पुढे येऊन मराठी साहित्यविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या हनुमंत चांदगुडे यांना समाजातील दानशूर व्यक्ती, साहित्यप्रेमी आणि संस्थांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा साहित्य साहित्य प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.






