फोटो सौजन्य सोशल मीडिया
इथिओपियन ऑर्थोडॉक्स तेवाहेडो चर्चने ही माहिती दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन समुदायातील नागरिकांचा समावेश आहे. अनेक घरे जाळण्यात आली असून २० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
चर्चने दिलेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर रोजी मेर्ती जिल्ह्यातील हल्ल्यात १४ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी शेरका जिल्ह्यातील टेरेटा, चोले आणि बिरबो परिसरात दुसरा भीषण हल्ला झाला. या हल्ल्यात तब्बल ४६ जणांना जीव गमवावा लागला.
अशा प्रकारे दोन्ही घटनांमध्ये मृतांचा एकूण आकडा ६० वर पोहोचला आहे. हल्ल्यांमध्ये २० हून अधिक घरे जाळण्यात आली असून २० पेक्षा अधिक नागरिकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सशस्त्र हल्लेखोरांनी गावांमध्ये घुसून नागरिकांना लक्ष्य केले. दोन चर्चवरही हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अनेक घरांची जाळपोळ करण्यात आल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या हिंसाचारामुळे परिसरातील कुटुंबांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिक सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या प्रयत्नात आहेत. धार्मिक समुदायाला लक्ष्य करून हल्ले होत असल्याची चिंता चर्चच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या हल्ल्यांमागे नेमके कोण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. ओरोमिया प्रादेशिक सरकारने या हल्ल्यांसाठी बंडखोर गटांशी संबंधित आघाडीला जबाबदार धरले आहे. दुसरीकडे, बंडखोर आघाडीशी संबंधित सूत्रांनी सरकारवरच गंभीर आरोप केले आहेत. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, इथिओपियन मानवाधिकार आयोगाने या घटनेची दखल घेत परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. चर्चने सरकारकडे नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.






