पुण्यातील वाहतुकीची कोंडी लवकरच सुटणार? डिसेंबरपर्यंत 4 ते 5 नवे पूल होणार (संग्रहित फोटो)
पुणे : विविध कारणांमुळे काम पूर्ण होण्यास विलंब झालेल्या उड्डाणपूलांच्या कामामुळे पुणेकरांची गैरसोय वाढली आहे. ही कामे नवीन वर्षात पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होईल, असा दावा पुणे महापालिका प्रशासनाने केला आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने विविध प्रकल्प हाती घेतले आहे. यामध्ये उड्डाणपूल, लोहमार्ग, नदीवरील पूल, कनेक्टिव्हिटी लिंक रॅम्प तयार करण्याचे काम आदीचा समावेश आहे. त्यापैकी पाच कामे अंतिम टप्प्यात आल्याचा दावा केला जात आहे. विविध कारणांमुळे ही कामे नियोजित वेळेत पूर्ण झाली नाही, त्याचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागत आहे.
महापालिकेकडून कोरेगाव पार्क, लष्कर परिसर, कल्याणीनगर, कर्वेनगर, बाणेर, घोरपडी अशा वेगवेगळ्या भागांत उड्डाणपूल, मुळा-मुठा नदीवरील पूल व रॅम्पची कामे सुरु आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणचे रस्ते बंद केले असून, काही ठिकाणांहून वाहतूक अन्यत्र वळविली आहे. परिणामी, नागरिकांना दूर वळसा घालून इच्छितस्थळी जावे लागते तर अनेकजण वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जात आहेत. पुणे स्टेशन, लष्कर परिसर व कोरेगाव पार्क, येरवडा, नगर रस्त्याला जोडणारा लोहमार्गावरील साधू वासवानी पूल हा पाडून नवीन बांधला जात आहे.
उड्डाण पूल जुना झाल्याने तो पाडून तेथे नवीन पूल उभारण्याचा निर्णय २०२३ मध्ये झाला रेल्वे प्रशासनाने तांत्रिक बाबी उपस्थित केल्या होत्या. तसेच या भागातील रहिवासींच्या पुनर्वसनचा विषय रखडला होता. पुलासाठी ओपन वेब गर्डर टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, डिसेंबरपर्यंत ते पूर्ण होईल.
कर्वेनगरमधील काम पूर्ण
पाषाण व सूस उड्डाण पुलास बंगळूर महामार्गावरील (एनएच ४८) सेवा रस्त्याशी जोडणारा कनेक्टिव्हिटी लिंक रॅम्प (समतल विलगक) तयार करण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे. संबंधित विकास आराखड्यातील सेवारस्त्याचे काम पूर्ण झाल्यास वाहतूक सुरळीत होणार आहे. याबरोबरच पाषाण-सूस रस्त्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक तसेच चांदणी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना महामार्गावर जाण्यासाठी नवीन वर्षात रॅम्प उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
सनसिटी येथील पूल महत्त्वाचा ठरणार
नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) व कर्वेनगर या दोन भागांना जोडणारा मुठा नदीवरील सनसिटी येथील पूल महत्त्वाचा ठरणार आहे. मुठा नदीवरील या पुलाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. कर्वेनगरकडील जोड रस्त्याचे काम झाले असून, सनसिटीकडील रस्त्याचे काम सुरु आहे.
घोरपडीतही मुक्तता
घोरपडी येथील लोहमार्गावर मिरज लाइन येथे महापालिकेकडून उड्डाणपूल उभारला जात आहे. दोन ते अडीच वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यास लष्कर परिसर, घोरपडी, मुंढवा, कोरेगाव पार्क, खराडी, पुणे स्टेशन या भागातील रहिवाशांची दररोज रेल्वेगेटवर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून मुक्तता होणार आहे. संबंधित पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या डांबरकाम, रंगरंगोटी, सेवावाहिन्यांचे स्थलांतर, वाहतूक चिन्हे या स्वरूपाची कामे सुरु आहेत. ही कामे ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होतील.
डिसेंबरपर्यंत 4 ते 5 नवे पूल होणार
महापालिकेकडून शहराच्या वेगवेगळ्या भागांत उड्डाण पूल, नदीवरील पूल व रॅम्पचे काम सुरू आहे. डिसेंबरअखेरपर्यंत ४ ते ५ ठिकाणच्या उड्डाण पूल व नदीवरील पुलांचे काम पूर्ण होईल. नवीन वर्षात संबंधित पूल वाहतुकीसाठी खुले होतील, तर एका पुलाचे काम मार्च २०२७ मध्ये पूर्ण होईल. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
– दिनकर गोजारे, प्रमुख, विशेष प्रकल्प विभाग, महापालिका.






