
चिंचवडच्या महापारेषण उपकेंद्रात स्फोटानंतर आग, मेट्रोसह उद्योगांनाही बसला फटका; तब्बल...
पुणे : महापारेषण कंपनीच्या चिंचवड येथील २२० केव्ही अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात रविवारी (दि. ६) दुपारी १२.२५ च्या सुमारास अचानक तांत्रिक बिघाड होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. उपकेंद्रातील २२ केव्ही सीटी (करंट ट्रान्सफॉर्मर) आणि ब्रेकरमध्ये मोठा स्फोट झाल्यानंतर ही आग भडकली. अग्निशामक दलाने तत्परता दाखवत आगीवर नियंत्रण मिळवले असले, तरी या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील तब्बल ३ लाख १० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. ऐन दुपारच्या सुमारास झालेल्या या बिघाडामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले होते.
चिंचवड उपकेंद्रातून महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर परिणाम झाल्यामुळे प्राधिकरण, रावेत, काळेवाडी, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी, पुनावळे आणि ताथवडे परिसरातील बत्ती गुल झाली. पिंपरी-चिंचवड व भोसरी भागातील सुमारे २ लाख ६० हजार, तर पुण्यातील शिवाजीनगर, औंध, गणेशखिंड, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी आणि बालगंधर्व परिसरातील सुमारे ५० हजार ग्राहकांना या बिघाडाचा थेट फटका बसला आहे.
मेट्रो सेवेवरही तात्पुरता परिणाम
रहाटणी व गणेशखिंड १३२ केव्ही वाहिनी बाधित झाल्याने पुण्यातील शिवाजीनगर गावठाण, औंध, गणेशखिंड परिसरातील वीजपुरवठा दुपारी १.५० पर्यंत पूर्णपणे ठप्प होता. गणेशखिंड उपकेंद्रातून पुणे मेट्रोला वीजपुरवठा केला जात असल्याने मेट्रो सेवेलाही काही काळासाठी याचा फटका बसला आहे. महावितरणने तातडीने पर्यायी भारव्यवस्थापन करत शहरातील बहुतांश भागांतील वीज दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्ववत केली; मात्र निगडी, यमुनानगर, बिजलीनगर, रावेत, मामुर्डी, देहूरोड, चिंचवड, ताथवडे आणि वाकडमधील सुमारे सव्वालाख ग्राहकांना वीज मिळण्यास मोठा विलंब झाला.
१,५०० उद्योगांचे कामकाज विस्कळीत
या बिघाडाचे पडसाद औद्योगिक पट्ट्यातही उमटले. आंबेठाण (चाकण) आणि तळेगाव १३२ केव्ही उपकेंद्रांवर परिणाम झाल्याने सुमारे १ हजार ५०० उद्योगांचे उत्पादन ठप्प झाले. तळेगाव शहराचा घरगुती वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला, तरी औद्योगिक वाहिनी पूर्ववत करण्यास अडचणी येत होत्या. अखेर दुपारी ४.२० वाजता आंबेठाण उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. सध्या महापारेषणकडून जळालेल्या यंत्रणेची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू असून, उर्वरित भागांत महावितरणमार्फत टप्प्याटप्प्याने वीज सुरू केली जात आहे.