
पुण्यात दसऱ्याच्या काळात वाहनखरेदीला ब्रेक
आरटीओच्या आकडेवारीनुसार, १० ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पुण्यात एकूण १० हजार ५३४ नवीन वाहनांची नोंदणी झाली. मागील वर्षी संबंधित सणासुदीच्या कालावधीत १४ हजार १६८ वाहनांची नोंदणी झाली होती. त्यामुळे यंदा वाहननोंदणीत ३ हजार ६३४ वाहनांची घट झाली आहे.
यंदाच्या सणासुदीच्या काळात दुचाकींची नोंदणी सर्वाधिक झाली. या कालावधीत ७ हजार ४६ दुचाकींची नोंदणी झाली. मात्र, मागील वर्षी याच कालावधीत ८ हजार ७ दुचाकींची नोंदणी झाली होती. त्यामुळे दुचाकींच्या नोंदणीतही घट झाल्याचे दिसून येते. चारचाकींच्या नोंदणीत तुलनेने मोठी घट झाली आहे. यंदा २ हजार ५९५ कारची नोंदणी झाली, तर मागील वर्षी ही संख्या ४ हजार ८१३ होती. म्हणजेच कारच्या नोंदणीत जवळपास ४६ टक्क्यांची घट झाली आहे.
नवरात्रीत वाहन विक्रीचा धुरळा!! अवघ्या 9 दिवसांत भारतात 10.32 लाख वाहनांची विक्री
एकीकडे पारंपरिक वाहनांच्या नोंदणीत घट झाली असताना इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत मात्र वाढ झाली आहे. यंदा १ हजार ६३८ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली. मागील वर्षी ही संख्या १ हजार ५६६ होती. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत सुमारे ४.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा १ हजार १८२ इलेक्ट्रिक दुचाकी आणि ३८२ इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली. इलेक्ट्रिक मालवाहू वाहनांच्या नोंदणीतही वाढ झाली असून, यंदा अशा ४४ वाहनांची नोंद झाली. मागील वर्षी ही संख्या १६ होती. इलेक्ट्रिक बसच्या नोंदणीतही वाढ होऊन यंदा तीन बसची नोंद झाली.
व्यावसायिक वाहनांच्या नोंदणीतही घट
खासगी वाहनांबरोबरच काही व्यावसायिक वाहनांच्या नोंदणीतही घट दिसून आली. यंदा २२९ टुरिस्ट टॅक्सींची नोंदणी झाली, तर मागील वर्षी ही संख्या ४२३ होती. रिक्षांच्या नोंदणीतही घट झाली असून, यंदा ४१ रिक्षांची नोंदणी झाली. मागील वर्षी १८३ रिक्षांची नोंद झाली होती. मालवाहू वाहनांची नोंदणी यंदा ५०७ झाली, तर मागील वर्षी ५७७ वाहनांची नोंदणी झाली होती. ट्रॅक्टरच्या नोंदणीतही घट झाली आहे. मात्र, बसच्या नोंदणीत किरकोळ वाढ झाली असून, यंदा ३६ बसची नोंद झाली आहे. मागील वर्षी ही संख्या ३३ होती.
दिवाळीत वाहनबाजाराला अपेक्षा
दसऱ्याच्या काळात वाहननोंदणी कमी झाली असली, तरी दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या काळात वाहनखरेदीला पुन्हा वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही ग्राहकांनी दिवाळीच्या मुहूर्तासाठी वाहनखरेदी पुढे ढकलली असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात वाहनबाजारातील उलाढाल कशी राहते, याकडे वाहनविक्रेते आणि वाहनउद्योगाचे लक्ष लागले आहे.
टाटा सिएराच्या प्लॅटफॉर्मवर येणार जीपची नवीन SUV! पण री-बॅजिंग नाही, डिझाइन असणार एकदम वेगळे
बातमीतील महत्त्वाची आकडेवारी
वाहनांचा प्रकार. २०२६ मधील नों. २०२५ मधील नों.
एकूण वाहने. १०,५३४. १४,१६८
दुचाकी. ७,०४६. ८,००७
चारचाकी कार. २,५९५. ४,८१३
इलेक्ट्रिक वाहने. १,६३८. १,५६६
टुरिस्ट टॅक्सी. २२९. ४२३
रिक्षा. ४१. १८३
मालवाहू वाहने. ५०७. ५७७
ट्रॅक्टर. ४२. १००
बस. ३६. ३३