
पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी नियंत्रणासाठी नवी व्यवस्था
दिवाळीच्या काळात पुणे रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यंदा दिवाळीनंतर छठपूजा असल्याने परराज्यांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानकावरील गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. गाडी पकडण्यासाठी फलाटावर जाणारे आणि गाडीतून उतरणारे प्रवासी एकाच वेळी एकत्र आल्यास गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये, यासाठी फलाटावरील गर्दी नियंत्रित करण्यावर भर देण्यात येणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट; प्रवाशांना मिळणार आधुनिक सुविधा
पुणे रेल्वे स्थानकावरील एसटी बसस्थानकाच्या मागील बाजूस, व्हीआयपी कक्षाशेजारी होल्डिंग झोन तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रवाशांना थांबण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची सुविधाही करण्यात आली आहे. रेल्वेगाडीला उशीर झाल्यास संबंधित प्रवाशांना या ठिकाणी थांबविण्याचे नियोजन आहे. फलाटांवर विनाकारण गर्दी होऊ नये आणि गाडी येण्यापूर्वी प्रवाशांची गर्दी एकाच ठिकाणी जमा होऊ नये, हा या व्यवस्थेमागील उद्देश आहे.
गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानकावर २४ तास सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांची गर्दी वाढल्यास फलाट तिकीटविक्री बंद करण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो. यामुळे अनावश्यकपणे स्थानकावर येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी करून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे.
सध्या पुणे रेल्वे स्थानकावर नऊ तिकीट खिडक्या आणि १८ स्वयंचलित तिकीटविक्री यंत्रे (एटीव्हीएम) आहेत. दिवाळीच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन या सुविधांमध्ये वाढ करण्याचे नियोजन आहे. तसेच उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या रांगा व्यवस्थित राहाव्यात, यासाठी फलाट क्रमांक एकवर रांगेची व्यवस्था करण्यात येणार आहे. गर्दीचे नियोजन, प्रवाशांची सुरक्षितता आणि फलाटांवरील हालचाल सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने या उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार आहेत.
पुणे रेल्वे स्थानक : दृष्टिक्षेपात
– एकूण फलाट : ६
– स्थानकावर ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्या : २७९
– पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या : ११७
– दैनंदिन प्रवासी संख्या : सुमारे १ लाख ९० हजार
– तिकीट खिडक्या : ९
– स्वयंचलित तिकीटविक्री यंत्रे : १८
दिवाळीच्या काळात पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी होल्डिंग झोन तयार करण्यात आला आहे. गर्दी वाढल्यास फलाट तिकीटविक्री बंद करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे स्थानकावरील आरपीएफ कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
— हेमंतकुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग
Ans: पुणे रेल्वे स्टेशनवर एकूण 6 प्लॅटफॉर्म आहेत.
Ans: गर्दीचे नियोजन करण्यासाठी आरपीएफ, सुरक्षारक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.