सौजन्य - नवराष्ट्र टीम
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळून आल्याने नदीच्या वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आळंदी नगरपरिषद पाणीपुरवठा केंद्रापासून उत्तर-दक्षिण दिशेने नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना मृत माशांचा खच दिसून आल्याने वारकरी, भाविक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आळंदीतील साठवण बंधारा ते चिंबळी बंधारा या परिसरात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळून आले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पीएमआरडीएच्या हद्दीतून सांडपाणी आणि रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करता इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नदीतील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले असून, दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या या प्रकाराकडे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तीर्थक्षेत्र विकासाच्या पार्श्वभूमीवर पवित्र इंद्रायणी नदीचे वाढते प्रदूषण ही गंभीर बाब असून, नदीत सोडले जाणारे सांडपाणी व रसायनमिश्रित पाण्याची तातडीने तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन
अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने इंद्रायणी नदीचे प्रदूषण तत्काळ रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची तसेच नदी प्रदूषणास कारणीभूत घटकांवर कारवाई करून दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पुणे जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, पुणे प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि पीएमआरडीए आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष वैभवराज रौंदळ आणि पुणे जिल्हा धार्मिक प्रकोष्ठ अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले.
कायमस्वरूपी उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. पुंडलिक मंदिरापासून डुडुळगाव पुलापर्यंत नदी परिसराची पाहणी केली असता अनेक ठिकाणी मृत मासे आढळल्याचा दावा महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. दरवर्षी इंद्रायणी नदीत अशा प्रकारे मासे मृत होण्याच्या घटना घडत असून, नदीत येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यामुळे हा प्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी. अन्यथा वारकरी, भाविक आणि नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारत हिंदू महासभेने दिला आहे.






