संग्रहित फोटो
पोलिस शिपाई आकाश मुळे हे खराडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना रात्रपाळी ड्युटी होती. तेव्हा त्यांना अनधिकृत आस्थापनांवर पानटपरी तसेच स्टॉल यांच्यावर रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत सुरू असल्यास कारवाई करण्याची जबाबदारी दिली होती. यादरम्यान झेन्सॉर रस्त्यावरील स्मोक शॉप उघडे असताना आकाश मुळे हे त्याठिकाणी सव्वा बाराच्या सुमारास तेथे गेले. त्यांनी संबंधित पानटपरीचालकाला सिगारेट विकताना पकडले. त्यांच्याकडील सर्व सिगारेट पिशवीत घालून संबंधित टपरी चालकाला घेऊन ते येत असताना वाटेतच आकाश मुळे यांनी त्यांना सुरुवातीला ५०० रुपये महिना द्यावा लागेल, असे सांगितले. तसेच, आता किती देऊ शकतो अशी विचारणा देखील केली. त्यावरून चालकाने त्यांना ३०० रुपये देतो आणि नंतर २०० रुपये, देतो असे सांगितले. तेव्हा आकाश मुळे यांनी ३०० रुपये घेऊन चालकाला सोडून दिले.
महिला अधिकाऱ्यांकडून कारवाई
दरम्यान, रात्रगस्तीवरील महिला पोलिस अधिकाऱ्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी याबाबत पानटपरी चालकाला बोलवून त्याचा जबाब नोंदवला. तेव्हा त्याने सर्व घटना सांगितली. त्यानंतर त्यांनी हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी तडकाफडकी पोलिस शिपाई आकाश मुळे यांना पोलिस खात्यातून निलंबित केले आहे.






