
ओतुर-धालेवाडीत प्रचाराचा धडाका! आरोप- प्रत्यारोप सुरुच; कोण मारणार बाजी?
आरोप-प्रत्यारोप सुरच
या निवडणुकीत सत्तेत असलेल्या आणि विरोधात असलेल्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. सत्ताधारी गट मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा पाढा वाचत आहे, तर विरोधक प्रलंबित रस्ते, पाणीप्रश्न आणि शेती प्रश्नावरून त्यांना धारेवर धरत आहेत. विकासाच्या गप्पा की पोकळ आश्वासने? “आम्ही करून दाखवले” विरुद्ध “केवळ आश्वासनांचा पाऊस” असा सामना सध्या सोशल मीडिया आणि जाहीर सभांमधून पाहायला मिळत आहे.
कोण मारणार बाजी?
ओतुर परिसरातील राजकारण नेहमीच चुरशीचे राहिले आहे. ओतूर-धालेवाडी जिल्हा परिषद गटात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर ओतूर-रोहोकडी पंचायत समिती गणात तरुण चेहऱ्यांनी प्रस्थापितांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
सध्या सर्वच उमेदवार “लोकाभिमुख विकासाचा” दावा करत असले, तरी खरा कौल मतदार राजाच्या हाती आहे. मतदारांनी मात्र सध्या तरी ‘मौन’ बाळगले असून, कोणाचे भविष्य उजळणार आणि कोण ‘कारभारी’ होणार, याचा फैसला आता मतपेटीतूनच होणार आहे. ”यावेळेस निवडणूक केवळ पक्षाची नाही, तर अस्तित्वाची आणि भागाच्या विकासाची आहे. आरोप-प्रत्यारोप होतीलच, पण प्रत्यक्ष कामाची पावती मतदार देतील.”असे मत गावागावातील पारांवर ऐकवयास मिळत आहे.
येत्या काही दिवसांतच ओतुर धालेवाडी जिल्हा परिषद गटाचा व ओतूर -रोहोकडी पंचायत समिती गणाचा नवा कारभारी कोण होणार?, याचे चित्र स्पष्ट होईल. प्रशासनाकडूनही मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीसह अपक्ष उमेदवारांनी शड्डू ठोकल्यामुळे लढत चौरंगी किंवा पंचरंगी होण्याची चिन्हे आहेत.
ओतूर हा परिसर आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या समृद्ध असल्याने, येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांच्या बड्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत उमेदवारांचे ताफा गावोगावी फिरताना दिसत आहे.
सत्ताधारी गटाचा दावा
“आम्ही गेल्या पाच वर्षांत कोट्यवधींचा निधी आणून रस्ते, पाणी आणि वीज यांसारखे मूलभूत प्रश्न सोडवले आहेत. हा विकासाचा वारू असाच पुढे नेण्यासाठी आम्हाला पुन्हा संधी द्या,” असे आवाहन सत्ताधारी करत आहेत.
विरोधकांचा हल्लाबोल
दुसरीकडे, विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आणि संथ गतीने चालणाऱ्या कामांचे आरोप केले आहेत. “केवळ कागदावर विकास दाखवून सामान्यांची दिशाभूल केली जात आहे, प्रत्यक्षात ओतूर-रोहोकडी पट्ट्यात अनेक समस्या जशाच्या तशा आहेत,” अशा शब्दांत विरोधकांनी तोफ डागली आहे. या निवडणुकीत शेतीचा पाणीप्रश्न, बाजार समितीमधील राजकारण, तरुणांसाठी रोजगार आणि ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा हे कळीचे मुद्दे ठरत आहेत.
उमेदवार गावोगावी जाऊन मतदारांना आश्वासनांची खैरात वाटत आहेत. मात्र, ‘मतदार राजा’ यंदा कमालीचा शांत आहे. उमेदवारांच्या आश्वासनांना प्रतिसाद देत असतानाच, मतदार मनात नक्की काय विचार करत आहे, याचा अंदाज बांधणे राजकीय विश्लेषकांनाही कठीण झाले आहे. धालेवाडी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडणारे मतदान आणि जातीय समीकरणे कोणाच्या बाजूने झुकणार, यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. घराघरात पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असून, व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर प्रचाराचे युद्ध पेटले आहे. विकासाच्या मुद्द्यावर मतदान होणार की पक्षीय निष्ठा श्रेष्ठ ठरणार? जुन्या जाणत्यांना संधी मिळणार की नवा चेहरा उदयाला येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे मतपेटीतून बाहेर येतील.