
image
बारामती, प्रतिनिधी : राजकीय वैमनस्यातून एका तरुणाची हत्या घडवून आणण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या मेडद (ता. बारामती) येथील विद्यमान सरपंच गणेश दत्तात्रय काशीद याला अखेर माळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा वापर करण्याचे नियोजन, आर्थिक व्यवहार आणि गावठी पिस्तुलांचा समावेश असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. या कारवाईमुळे बारामती तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Baramati News)
८ जून २०२६ रोजी माळेगाव ते कऱ्हावागज रस्त्यावरील तुकाई चौकात पोलिसांनी गणेश तात्याराम गावडे (वय २०, रा. कऱ्हावागज) याला चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे बेकायदा गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि कुकरी आढळली होती. या शस्त्रांचा संबंध मेडद येथील मयूर विष्णू मोरे याच्याशी असल्याचे तपासात पुढे आले.
त्यानंतर पोलिसांनी संबंधितांची चौकशी केली असता, मेडद येथील अभिजित अर्जुन यादव या तरुणाला संपविण्याचा कट रचल्याचा संशय पुढे आला. या प्रकरणात सरपंच गणेश काशीद आणि कऱ्हावागज येथील सुजित निलेश नाळे यांची नावे तपासात समोर आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, या कटासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचेही उघड झाले आहे. गणेश गावडे याच्या जमिनीच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांपैकी आठ लाख रुपयांचा धनादेश मयूर मोरे याच्यामार्फत बारामती येथील पीडीसीसी बँकेतून वटविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर बारामतीतील खंडोबानगर परिसरातील पेट्रोल पंपाजवळ फॉर्च्युनर गाडीत असलेल्या सुजित नाळे याला पाच लाख रुपये रोख आणि दोन गावठी पिस्तुले देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा वापर करून हत्या घडवून आणण्याचे नियोजन केल्याचा आरोप आहे. त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य वाढले असून, या कटातील इतर व्यक्तींची भूमिका आणि शस्त्रांचा स्रोत याबाबत तपास सुरू आहे.
गणेश काशीद आणि सुजित नाळे यांचा सहभाग समोर आल्यानंतर १२ जून रोजी गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे वाढविण्यात आली. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर काशीद फरार झाला होता. तो वारंवार ठिकाणे बदलून पोलिसांना चकवा देत असल्याचे सांगण्यात आले.
अखेर शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) दुपारी सुमारे तीन वाजता माळेगाव पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. काशीद याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसह १३ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहितीही समोर आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलिस उपनिरीक्षक देविदास साळवे तसेच पोलिस अंमलदार अमोल वाघमारे, ज्ञानेश्वर मोरे आणि श्रीकांत माने यांनी ही कारवाई केली.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, कटातील सर्व संबंधितांची भूमिका स्पष्ट होण्याकडे लक्ष लागले आहे.