मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती पदी भाजपचे सुभाषराव जाधव विजयी झाले (फोटो सोशल मीडिया)
Maval APMC MNews : वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, मावळ (Vadgaon-Maval) तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत मोठी उलटफेर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असूनही भारतीय जनता पक्षाचे (BJP Politics) सुभाषराव जाधव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम कलवडे यांचा पराभव करत सभापतीपदावर झेंडा फडकवला. दरम्यान, उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे विलास मानकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
निवडणूक जाहीर झाल्यापासून तळेगाव दाभाडे येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सभापती आणि उपसभापती पद समान कालावधीसाठी वाटून देण्याचे ठरले होते. राष्ट्रवादी, भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ‘चिठ्ठी’ टाकून संधी देण्याचे निश्चित केले होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे आणि बबनराव भेगडे,ॲड नामदेव दाभाडे या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विक्रम कलवडे (सभापती) व विलास मानकर (उपसभापती) यांची नावे निश्चित झाली होती. मात्र, ‘राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही’ असे ठरलेले असतानाही प्रत्यक्ष निवडणुकीत वेगळेच चित्र पाहायला मिळाले. भारतीय जनता पक्षाने सुभाषराव जाधव यांच्या रूपाने अनपेक्षितपणे उमेदवार उभा केला, ज्यामुळे ठरलेली ‘चिठ्ठी पद्धत’ बाजूला पडून प्रत्यक्ष मतदान घेण्याची वेळ आली.
हे देखील वाचा : वडगाव मावळमध्ये पोलीस प्रशासनात फेरबदल; दोन ठाण्यांना नवे अधिकारी
राष्ट्रवादीची मते फुटली; भाजपाचा ‘मास्टरस्ट्रोक’
बाजार समितीच्या एकूण १८ संचालकांपैकी राष्ट्रवादीकडे १२, भाजपाकडे ५ आणि आय काँग्रेसकडे १ असे बलाबल होते. राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असतानाही त्यांच्या गटातील ५ ते ६ मते फुटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्ष मतदानात भाजपचे सुभाषराव जाधव ११ मते मिळवत विजयी झाले. तर राष्ट्रवादीच्या विक्रम कलवडे यांना अवघी ७ मते मिळाली. उपसभापती पदासाठी भाजपाच्या साईनाथ मांडेकर यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादीचे विलास मानकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांनी निकालाची अधिकृत घोषणा केली.
हे देखील वाचा : जादूटोणा विरोधी कायदा अधिक प्रभावी करण्याच्या मागणीला जोर; समिती रद्द करण्यास विरोध
आमदार सुनील शेळके यांच्यासाठी मोठा धक्का
मावळ तालुक्यावर एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार सुनील शेळके यांच्यासाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. तालुक्यात आता राजकीय वारे फिरू लागले असल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू झाली आहे. निकाल जाहीर होताच भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. या प्रसंगी भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, गुलाबराव म्हाळसकर, अंकुश आंबेकर, किरण भिलारे, अरुण चव्हाण, अशोक मानकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






