
पुरंदरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलन; जिल्हा परिषद अन् पंचायत निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीला अपयश आल्यानंतर यांनी होम पीच असलेल्या पुणे जिल्ह्यावर आता लक्ष केंद्रित केले आहे. त्यादृष्टीने शिवसेना व भाजपाला रोखण्यासाठी एकत्रित निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी बारामती येथे कृषी प्रदर्शननिमित्त एकत्र आलेले ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रदर्शन पाहणी मध्येच सोडून तातडीची बैठक घेतली. तसेच दोन्ही राष्ट्रवादीने घडाळ या चिन्हावर एकत्रित निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली.
बारामतीचा कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्रितपणे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली. त्या दृष्टीने सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचाच राहील यादृष्टीने आम्ही कामाला लागलो. आमची तालुक्यात मोठी ताकद आहे. त्यामुळे समोर कोणताही पक्ष आणि उमेदवार असला तरी आम्ही त्यावर मात करू एवढी आमची क्षमता आहे. -विजयराव कोलते, जेष्ठ नेते राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष.
सासवड येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते आणि अजित पवार गटाचे नेते जालिंदर कामठे यांनी पुरंदरला दोन्ही राष्ट्रवादी घडाळ्याच्या चिन्हावर एकत्रित निवडणुका लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हा बँकेचे चेअरमन डॉ. दिगंबर दुर्गाडे, संभाजी कुंजीर, माणिकराव झेंडे पाटील, सुदामराव इंगळे, उत्तम धुमाळ, गौरी कुंजीर, राहुल गिरमे, बाळासाहेब कामठे, राजेंद्र धुमाळ, वामन जगताप, गौरव कोलते आदी उपस्थित होते.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवणार आहे. जे इच्छुक उमेदवार असतील त्या सर्वांना अर्ज भरण्यास सांगितले आहे. दोन दिवसांत अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात येतील. निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीलाच उमेदवारी देण्यात येणार आहे. – जालिंदर कामठे, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी, अजित पवार पक्ष.