स्वारगेट-कात्रज मेट्रोला केंद्राची मंजुरी (फोटो- istockphoto)
पुणे: शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्वारगेट मेट्राे स्टेशन येथून कात्रज पर्यंतच्या साडेपाच किलाेमीटर अंतरावरील मार्केटयार्ड, पदमावती व कात्रज या तीन मेट्राे स्टेशनचा प्रस्तावित भूमिगत मेट्राे मार्गास केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे या मार्गावरील निविदा प्रक्रिया सुरु हाेऊन त्यानंतर वर्क ऑर्डर लवकर काढण्यात येईल. त्या बरोबर या मार्गावर तीन मेट्राे स्थानका ऐवजी प्रवासी मागणीनुसार पाच मेट्राे स्टेशन करावी यामध्ये बालाजीनगर व सहकारनगर-बिबवेवाडी मेट्राे स्टेशनचा समावेश करण्याबाबत व्यवहार्यता तपासावी अशी सुचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी साेमवारी पुणे मेट्राे प्रशासनाला केली.
राज्यमंत्री मिसाळ यांनी पुणे मेट्राे कार्यालयात मेट्राे कामकाजाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुणे मेट्राेचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक अतुल गाडगीळ, संचालक विनाेदकुमार अग्रवाल, कार्यकारी संचालक हेमंत साेनवणे उपस्थित हाेते.
मिसाळ म्हणाल्या, पुण्यातील सार्वजनिक वाहतुक सक्षम करण्यास राज्यसरकारचे प्राधान्य आहे. पुणे मेट्राे एक महत्वपूर्ण प्रकल्प असून त्याची कामे वेगाने पूर्ण हाेऊन वाहतूक काेंडी दूर व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्याचे पहिल्या दिवसापासून शहरातील वाहतूक काेंडी कमी करण्यासाठी ‘ ‘ट्रान्सपाेर्ट मॅपिंग’चा विषय हाती घेतला आहे. नेमके मेट्राे, बस, रेल्वे, रिक्षा काेठे आहे याची एकत्रित माहिती प्रवाशांना मिळणे गरजेचे आहे. त्याबाबत एकत्रित नकाशा आम्ही विविध यंत्रणांशी समन्वय साधून तयार करत आहोत.
पुण्यातील वनाझ ते चांदणी चाैक आणि रामवाडी ते वाघाेली (विठ्ठलवाडी) या दाेन मेट्राे मर्गिकांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे असून कॅबिनेट बैठकीत लवकरच त्यास अंतिम मान्यता मिळेल. याशिवाय खडकवासला ते खराडी आणि माणिकबाग- वारजे- एसएनडीटी असे दाेन मेट्राे मार्गाचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले असून ते तज्ज्ञ कमिटीसमाेर जाऊन त्याबाबत पुढील निर्णय हाेईल.
स्वारगेट एसटी स्थानक व मेट्राे मल्टीमाॅडेल हब जाेडणार
स्वारगेट मेट्राे स्टेशन येथे मल्टीमाॅडेल ट्रान्सपाेर्ट हब तयार करण्यात येत असून ते स्वारगेट एसटी स्थानकास देखील जाेडण्यात यावे याबाबतचा प्रस्ताव पुणे मेट्राेने एमएसआरटीसी यांना द्यावा. त्यानुसार सदर मेट्राे स्टेशन व एसटी स्टेशन एकमेकांना जाेडल्यास प्रवाशांना त्याचा फायदा हाेईल असे सांगत राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, एमएसआरटीसी व पुणे मेट्राे याबाबत नवीन करार करतील त्यानुसार आगामी काळात काम सुरु हाेईल.
शिवाजीनगर मेट्राे स्टेशन येथे देखील शिवाजीनगर एसटी स्थानक मेट्रो सोबत समन्वय ठेवून एकत्रितरित्या नियोजन करून निर्माण केले जाईल. पुढील आठवडयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एकत्रित बैठक होणार आहे. त्यात विविध गाेष्टींवर निर्णय घेतला जाईल. मेट्राेची प्रवासी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने बस, रिक्षा स्थानक यांचे नजीकचे पर्याय प्रवाशांना उपलब्ध करुन देण्याबाबत देखील नियाेजन करण्यास सांगण्यात आले आहे.






