स्वारगेट बस्थानकाच्या विकासाकडे दुर्लक्ष (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे /चंद्रकांत कांबळे: महाराष्ट्रातील मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळख असलेले पुण्यातील स्वारगेट बसस्थानक गेल्या सात दशकांपासून जवळपास सर्वच जिल्ह्यांतून प्रवासी येथे येतात. मात्र, पश्चिम महाराष्ट्राचे हे केंद्रबिंदू असलेले बसस्थानक आजही मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहिलेले आहे. पावसाळ्यात इमारतींमध्ये पाणीगळती, छताचा गिलावा निघून लोखंडी सळ्या (रॉड) उघड होणे, जागोजागी खड्डे आणि साचलेले पाणी,प्रवाशांसाठी पाणीपोई आहे पण असले तरी प्रचंड खराब आहे. स्वारगेट बस स्थानकात दररोज १,३०० बस सोडल्या जातात आणि बाहेरून १,५०० बस येतात. साधारणपणे, या बस स्थानकातून दररोज ५०,००० ते ६०,००० प्रवासी प्रवास करतात. ‘नवराष्ट्र’ने केलेल्या पाहणीत प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
तीन मंत्री असूनही स्वारगेट बसस्थानाकडे दुर्लक्ष का?
पुणे शहरात एक केंद्रीय राज्यमंत्री, एक राज्य कॅबिनेट मंत्री आणि खुद स्वारगेटचे आमदार व राज्यमंत्री माधुरी मिसाळ असतानाही, या बसस्थानकाच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष का होत आहे? बारामती आणि कराडच्या धर्तीवर आधुनिक व सुसज्ज बसस्थानक उभारले जावे, अशी प्रवासी व स्थानिकांची मागणी आहे.
स्वारगेट बसस्थानक नेहमी वाद – विवादात असते
अलीकडच्या काही वर्षांत स्वारगेट बसस्थानक वारंवार वाद विवादात सापडले आहे. काही महिन्यांपूर्वी येथे एक दुर्दैवी घटना घडली होती. त्या घटनेनंतरही प्रशासन किंवा शासनाने ठोस उपाययोजना केल्याचे दिसत नाहीत. याशिवाय बसस्थानक परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व व्यसनाधीन लोकांचा वावर असल्याने प्रवासी व स्थानिक नागरिक त्रस्त आहेत.
या सर्व परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सोयी-सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी तसेच प्रवाशांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. परिणामी, या बसस्थानकाच्या नव्या उभारणीसाठी आणि सर्वांगीण आधुनिकीकरणासाठी ठोस पावले उचलली जाण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.स्वारगेट बसस्थानक हे केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या दळणवळणासाठी महत्वाचे आहे.
स्वारगेट बसस्थानक चोरट्यांचेच! कडक बंदोबस्त असतानाही प्रवाशाचा लॅपटॉप चोरला
स्वारगेट बसस्थानक चोरट्यांचेच!
स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर येथील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहन महामंडळ तसेच पुणे पोलिसांनी ऑडिट अन् बैठका घेऊन नियोजन केले आहे. त्यानूसार, २४ तास सुरक्षा ठेवण्यास सुरूवात देखील केली. मात्र, तरीही बसस्थानकाचा आणि स्वारगेटचा परिसर चोरट्यांचाच असल्याचे दिसत असून, अत्याचाराच्या घटनेनंतर सलग तिसऱ्यांदा प्रवाशांकडील ऐवज चोरून नेण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांची ही चोख बंदोबस्ताची सुरक्षा भेदून चोरटे फिरत असल्याचे यावरून दिसत आहे. एकूणच प्रकारानंतर स्वारगेटचा परिसर हा चोरट्यांचाच असल्याचे दिसत आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात रविवारी घडलेल्या घटनेत रितेश गजानन बकरे (वय २०) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यावरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.