
डीजेविरोधात पुणेकर एकवटले! बालगंधर्व चौक ते पुणे महापालिकेपर्यंत निषेध मोर्चा; ध्वनीप्रदूषणावर कारवाईची मागणी
सुनयना सोनवणे/ पुणे : कर्णकर्कश डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात पुणेकर रविवारी रस्त्यावर उतरले. सकाळी बालगंधर्व चौक येथून जंगली महाराज रस्त्याने पुणे महानगरपालिकेपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. ‘डीजे बंदी झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत नागरिकांनी ध्वनीप्रदूषणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. ‘लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचा’च्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. मोठ्या प्रमाणात पुणेकर यात सहभागी झाले होते.
धार्मिक, जातीय किंवा राजकीय मिरवणुका आणि उत्सवांमध्ये नियमांचे उल्लंघन करून वाजविण्यात येणाऱ्या कर्णकर्कश लाऊडस्पीकर, डीजे आणि तत्सम ध्वनीयंत्रणांवर बंदी आणावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. याबाबत पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांना निवेदन देण्यात आले.
कार्यक्रम झाल्यानंतर नोटिसा बजावणे, ध्वनीयंत्रणा जप्त करणे किंवा काही दिवसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. नियोजित कार्यक्रमाच्या काही तास आधी पोलीस, महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त पथकांनी कार्यक्रमस्थळ, ध्वनीयंत्रणा उभारण्याची ठिकाणे आणि मिरवणुकीच्या प्रारंभस्थळाची तपासणी करावी. नियमबाह्य साऊंड सिस्टीम, स्पीकर वॉल अथवा जनरेटर आढळल्यास गर्दी जमण्यापूर्वीच ते थांबवून जप्त करावेत, अशी मागणी करण्यात आली.याशिवाय प्रभागनिहाय नियुक्त अधिकाऱ्यांची संपर्क क्रमांकांसह यादी जाहीर करावी, ध्वनीपातळीची माहिती नागरिकांना रिअल टाइममध्ये उपलब्ध करून द्यावी आणि ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारी व त्यावर झालेल्या कारवाईचा दैनिक अहवाल प्रसिद्ध करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
‘नागरिकांचा कोणत्याही सण-उत्सवाला विरोध नाही; विरोध अमर्याद आणि अतिरेकी डीजे-डॉल्बीला आहे. जीवघेणा आवाज थांबवायला हवा.’ – राहुल डंबाळे, सामाजिक कार्यकर्ते.
‘४ टॉप, ४ बेस’ या ध्वनीयंत्रणेच्या रचनेमुळे ६५ डेसिबलच्या अनुज्ञेय मर्यादेचे पालन कसे होते, याचा तांत्रिक आधार प्रशासनाने स्पष्ट करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून नुकसानभरपाईची तरतूद करण्याची मागणीही करण्यात आली. नागपूर आणि सोलापूरमध्ये ध्वनीप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी होत असेल, तर पुण्यातच मोकळे रान का, असा सवालही आंदोलकांनी उपस्थित केला.
‘केवळ गणेशोत्सव नाही, तर इतर सर्व धार्मिक, जातीय आणि राजकीय मिरवणुका व उत्सवांमधील बेकायदेशीर कर्णकर्कश लाऊडस्पीकर आणि आरोग्यास घातक ध्वनीप्रदूषण करणाऱ्या उपकरणांवर बंदी आणावी.’ -मुकुंद किर्दत, सामाजिक कार्यकर्ते.
तरुणांचा सहभाग कमी
डीजेला विरोध करण्यासाठी झालेल्या या आंदोलनात प्रौढ नागरिकांचा प्रतिसाद तुलनेने अधिक दिसून आला. चाळिशीपुढील नागरिकांची संख्या लक्षणीय होती. त्याच्या तुलनेत तरुणांचा सहभाग कमी असून, अंदाजे १५ ते २० टक्के तरुण आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले. डीजेच्या दुष्परिणामांबाबत तरुणांमध्ये जनजागृतीची गरज असल्याचेही यावेळी बोलले जात होते.
मुक्या प्राण्यांसाठीही आवाज ठरतोय त्रासदायक
डीजेच्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास केवळ माणसांनाच नव्हे, तर मुक्या प्राण्यांनाही होतो, याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनात प्राण्यांशी संबंधित संदेश असलेल्या फलकांचाही वापर करण्यात आला. पाळीव प्राण्यांना मोठ्या आवाजामुळे होणारा त्रास अधोरेखित करत नागरिकांनी प्राण्यांच्या संरक्षणासाठीही आवाज उठवला.