संग्रहित फोटो
याप्रकरणी भवानी पेठेतील व्यावसायिकाने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, आरोपी सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ७०, रा. नाना पेठ) आणि मनेष उर्फ मनोज चंद्रकांत वर्देकर (वय ५६, रा. कस्तुरे चौक, गुरुवार पेठ) या दोघांवर खंडणी उकळणे, अतिक्रमण करणे या भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या जमिनीच्या विकसनासाठी तिचा ताबा सोडावा अशी मागणी जागामालकाकडे बंडू आंदेकरकडे केली होती. त्याबदल्यात दोन दुकाने किंवा दीड कोटी रुपये आणि महापालिकेच्या कामासाठी तीस लाख रुपयांची खंडणी आंदेकरने मागितली; तसेच खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
धुळे कारागृहातून केले हजर
बंडू आदेकर सध्या नातू आयुष कोमकरच्या खून प्रकरणात धुळे कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला प्रोडक्शन वॉरंटद्वारे समर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी (ता. २२) दुपारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. बंडू आंदेकरने भाडेस्वरुपात उकळलेल्या ५ कोटी ४० लाख रुपये खंडणीचा काय वापर केला? या रकमेचे आणखी कोण लाभार्थी आहेत? अशा प्रकारे दहशतीच्या आधारे आरोपींनी इतर लोकांकडून खंडणी उकळली आहे का? याचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अनिल कुंभार यांनी केली. आरोपीतर्फे अॅड. मिथुन चव्हाण यांनी बाजू मांडली.






