
दुर्गा ब्रिगेडला राष्ट्रीय पक्षाची मान्यता; भोसरीत मुख्य कार्यालयाचे उद्घाटन
दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाची स्थापना महिला, युवक, विद्यार्थी, शेतकरी व कामगारांच्या हक्कांसाठी निर्भय लढा उभारण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे पक्षाचे मार्गदर्शक अभय भोर यांनी सांगितले. सामान्य जनतेचे हक्क, महिलांचा सन्मान व सुरक्षा तसेच अन्यायाविरोधात निर्णायक संघर्ष करणे, हे पक्षाचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना दुर्गा भोर म्हणाल्या की, आजपर्यंत महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री लाभलेली नाही. भविष्यात महिलांना समान संधी देण्यासाठी दुर्गा ब्रिगेड कटिबद्ध आहे. ग्रामीण व शहरी भागात उद्योग गट स्थापन करून रोजगारनिर्मितीला चालना दिली जाईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील. महिला कामगारांच्या प्रश्नांसाठी पक्ष सक्रिय भूमिका घेणार असून, महिलांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली जाणार आहे.
हे सुद्धा वाचा : पुरंदरमध्ये राजकीय घडामोडींना वेग; विजय शिवतारे अन् संजय जगताप यांच्यात युती होणार?
शेतकऱ्यांसाठी हमीभाव, पाणी साठवण योजना, असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा, विधवा महिलांसाठी पेन्शन योजना यासह विविध कल्याणकारी धोरणे प्रभावीपणे राबविली जातील. महिलांच्या नावावर असलेल्या योजनांचा लाभ खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येईल. यावेळी पक्षाचा जाहीरनामा अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत दुर्गा ब्रिगेडचे उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही करण्यात आली. कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, समिती सदस्य, कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा : भाजपमधील इच्छुकांचे आरक्षण साेडतीकडे लक्ष; पुण्याचा महापौर कोण होणार?