सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वांसाठीच मोठ्या आनंदाचा उत्सव. मात्र ज्यांच्या नावातच ‘गणेश’ आहे, अशा गणेश भेळने यंदा अतिशय अनोखा व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे योजले आहे. पाणीपुरीच्या २१ हजार पुऱ्यांचा वापर करुन १३ फूट उंच आणि १० फूट रुंद असा आगळावेगळा गणपती साकारला आहे. नामदार गोखले पथावरील (फर्ग्युसन रस्ता) गणेश भेळच्या दालनाबाहेर ही मूर्ती उभारण्यात आली आहे. गणेश भेळचे संस्थापक रमेश गुडमेवार व छाया गुडमेवार यांच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण करण्यात आले आहे. यावेळी संचालक रुपेश गुडमेवार, दिनेश गुडमेवार व अनुष्का गुडमेवार उपस्थित होते.
मूर्तीवरील या पुऱ्या १२ दिवस आहेत, तशाच राहाव्यात यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. अशाप्रकारे अनोख्या रितीने गणपती साकारण्याचे यंदाचे चौथे वर्ष असून, दरवर्षी वेगळी संकल्पना घेऊन गणेश भेळ ग्राहकांसमोर येत असते. ही मूर्ती तयार करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून तयारी सुरू होती. या सर्व पुऱ्या आपल्या कारखान्यात तयार करण्यात आल्या आहेत. तर कलाकार प्रशांत साळुंखे यांनी ही मूर्ती प्रत्यक्षात साकारली आहे. या पुऱ्या तयार करण्यासाठी वाया जाणाऱ्या/उरलेल्या पिठाचा पुनर्वापर करण्यात आला आहे. तसेच मूर्तीच्या संरचनेसाठी बांबू आणि कागदासारख्या नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. पुनर्वापर आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक संदेश देण्याचा हा गणेश भेळचा प्रयत्न आहे, असे रुपेश गुडमेवार यांनी सांगितले. नागरीकांच्या प्रतिसादामुळेच आम्हाला असे काही करण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
संचालक दिनेश गुडमेवार म्हणाले, “आमच्यासाठी ‘गणेश’ हे नाव केवळ आमच्या व्यवसायाचे नाव नाही, तर आमच्या आयुष्याशी जोडलेले एक नात आहे. आमच्या हातातल्या पाणीपुरीची प्रत्येक पुरी आमच्यासाठी फक्त एक पुरी नव्हती, तर त्या प्रत्येक पुरीत आम्हाला ‘गणेश’ दिसत गेला. १९७८ मध्ये आमचे वडील रमेश गुडमेवार आणि आई श्रीमती छाया रमेश गुडमेवार यांनी पुण्यात एका साध्या हातगाडीपासून गणेश भेळची सुरुवात केली. अस्सल चव, उत्तम गुणवत्ता आणि ग्राहकांचे समाधान या मूल्यांवर सुरू झालेला हा छोटासा व्यवसाय आज पुण्याच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीतील एक लोकप्रिय आणि विश्वासार्ह ब्रँड म्हणून नावारूपाला आला आहे.”
आज गणेश भेळच्या ३५ हून अधिक शाखा असून, २२ देशांमध्ये हा माल निर्यात केला जातो. आई-वडीलांनी सुरू केलेली ही परंपरा आम्ही पुढे नेत असून, आधुनिक व्यवस्थापन, गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण विचारांच्या माध्यमातून ब्रँडचा विस्तार करत आहेत. पुढील १२ दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत हा गणपती गणेशभक्तांना पाहता येणार आहे. शिवमुद्रा ढोलताशा पथकाने यावेळी अतिशय उत्तम असे वादन करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली, असेही त्यांनी सांगितले.






