
Ganesh Jayanti celebrated in a golden cradle at the Dagdusheth Halwai Ganpati mandir pune
Dagdusheth Halwai Ganapati : पुणे : जय गणेश, जय गणेश… श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय… चा जयघोष आणि वक्रतुंडाचे रूप आगळे, मोठाले कान बारीक डोळे, मूषकाच्या पाठी बसून खेळे, जो बाळा जो जो रे जो… असे पाळण्याचे स्वर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात निनादले. लाडक्या गणपती बाप्पाचा माघ शुध्द चतुर्थीला जन्म सोहळा साजरा होताना मंदिरात पाळण्यावर पुष्पवृष्टी करीत असताना गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. पारंपरिक वेशात सहभागी महिला आणि शेकडो भक्तांच्या उपस्थितीत सुवर्णपाळण्यात यंदाही गणेश जन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा श्री गणेशाचा विनायक अवतार आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे श्री गणेश जन्म सोहळा मंदिरात थाटात पार पडला. यावेळी संगीता रासने, मृणालिनी रासने, ज्योती सूर्यवंशी, शारदा गोडसे, तृप्ती चव्हाण, पूनम चव्हाण, वर्षा केदारी, अर्चना भालेराव यांसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, सिद्धार्थ गोडसे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रथमेश कापरे यांनी सपत्नीक गणेश जन्माची पूजा केली.
हे देखील वाचा : तयारी केली पण….; ‘या’ नेत्यांचं महापौर होण्याचं स्वप्न भंगलं, पुण्यात काय होणार?
अर्चना भालेराव यांसह उपस्थित महिलांनी गणेशजन्माचा पाळणा आणि गणेश गीते म्हटली. शुभचिन्हे आणि मोदक यांची फुलांमध्ये मंदिरावर आकर्षक आरास करण्यात आली होती. गणेशजन्म सोहळ्यानिमित्त बुधवारी पहाटे मंदिरात भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी श्रीं चरणी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. तर गुरुवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. याशिवाय गणेश सूक्त अभिषेक देखील मंदिरात सुरू होता. तसेच सकाळी ६ ते १० आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ५ यावेळेत गणेश याग संपन्न झाला.
हे देखील वाचा : आरक्षण सोडतीवरुन पेटलं रान! BMC आरक्षणावर शिवसेना ठाकरे गटाचा आक्षेप
मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी १२ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर श्री गणेशाची मंगल आरती देखील झाली. सायंकाळी नगरप्रदक्षिणा मिरवणूक दगडूशेठ गणपती मंदिरापासून थाटात निघाली. यामध्ये गणेशभक्तांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. रात्री ८ वाजता श्रीगणेशाची मंगलआरती आणि रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला होता. गणेशजन्माच्या दिवशी पहाटे ३ वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले होते. त्यामुळे भाविकांनी लाखोंच्या संख्येने पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. पुणेकरांनी मोठ्या उत्साहामध्ये गणेश जयंती साजरी केली असून दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर मोठी गर्दी केली आहे.