
भीमाशंकर परिसरात अतिवृष्टीचा तडाखा! दरड कोसळल्याने दोन प्रमुख मार्ग बंद
मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकरजवळील कोंढवळ परिसरात बुधवारी(दि. २३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. सुमारे दोन ते अडीच तास झालेल्या अति मुसळधार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे कोंढवळ–ढगेवाडी रस्त्यावरील काचळ घाट येथे दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दरम्यान, निगडाळे–भीमाशंकर मार्गावरील कोंढवळ फाटा ते कोंढवळ गावादरम्यानही दरड कोसळण्याबरोबरच मोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद पडली आहे. काचळ घाट परिसरात दरड कोसळल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती, दगड व मुरूम आल्याने कोंढवळकडून ढगेवाडीच्या दिशेने होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय
दरम्यान, निगडाळे–भीमाशंकर मार्गावरील कोंढवळ फाटा ते कोंढवळ गावादरम्यानही दरड कोसळण्याबरोबरच मोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची वाहतूक करणे शक्य झालेले नाही. दरड व झाडांमुळे दोन्ही मार्ग बंद झाल्याने कोंढवळ, शिंदेवाडी आणि गवांदेवाडी परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. या दोन्ही मार्गांवरून परिसरातील सुमारे दोनशे कुटुंबांची नियमित ये-जा असते. रस्ते बंद झाल्याने विद्यार्थी, शेतकरी, कामानिमित्त बाहेर जाणारे नागरिक तसेच अत्यावश्यक कामांसाठी प्रवास करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामपंचायतीने झाडे व दरड हटवली
मुसळधार पावसामुळे रस्त्यावर माती, दगड व झाडे पडल्याने नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना खबरदारी घेण्याची गरज आहे. संबंधित प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून दरड व उन्मळून पडलेली झाडे तातडीने हटवावीत आणि दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत खुले करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. ग्रामपंचायतीने जेसीबीच्या साह्याने झाडे व दरड हटवून रस्ता आता चालू करण्यास सुरुवात केली आहे.
कोंढवळ धबधबा पुन्हा प्रवाहित
श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात बुधवार दिनांक २३ रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कोंढवळ धबधबा पुन्हा जोरदारपणे वाहू लागला आहे. जवळपास सव्वा महिन्याच्या विश्रांतीनंतर भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने डोंगरभागातील ओढे-नाले पुन्हा प्रवाहित झाले असून, त्याचा परिणाम कोंढवळ धबधब्यावर झाला आहे. गेल्या एक महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने कोंढवळ धबधब्याच्या प्रवाहातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. त्यामुळे धबधब्याचे आकर्षण काहीसे कमी झाले होते. मात्र, बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाणी धबधब्याकडे आले. त्यामुळे कोंढवळ धबधबा पुन्हा वेगाने कोसळू लागला आहे. धबधबा पुन्हा प्रवाहित झाल्याची माहिती मिळताच पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक येत असले तरी पाण्याचा वाढलेला प्रवाह आणि घसरडा परिसर लक्षात घेऊन वन विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव धबधब्यात उतरण्यास मज्जाव केला आहे.