
सनईच्या मंगल सुरावटींनी ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात; किराणा घराण्याच्या…; PMP देणार विशेष सेवा
सवाईचे दुसरे सादरीकरण तरूण सरोदवादक इंद्रायुध मजुमदार यांचे होते. संगीतकलेचा समृद्ध वारसा लाभलेले इंद्रायुध हे विख्यात सरोदवादक पं. तेजेंद्र नारायण मजुमदार यांचे पुत्र आणि शिष्य. इंद्रायुध यांनी राग श्री मध्ये आलाप, जोड, झाला अशा क्रमाने वादन करत, रागाचे जणु स्वरचित्र रेखाटले. सरोदचा धीरगंभीर नाद मंडपात भरून राहिला. त्यांनी राग मांजखमाजमधील उस्ताद अल्लाउद्दीन खाँसाहेब यांच्या दोन रचना पेश केल्या. द्रुत लयीतील या वादनात तबलावादक ईशान घोष यांच्यासह सवाल जवाब विलक्षण रंगले. त्यांच्या वादनाला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली. दिगंबर जाधव यांनी तानपुऱ्यावर साथ केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
स्वरमंचावर वाजवण्याची संधी मिळाली हे भाग्य
‘सवाई’ मधील पहिल्याच सादरीकरणाबद्दल इंद्रायुध मजुमदार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, मी जेव्हापासून सरोद हे वाद्य वाजवू लागलो तेव्हापासून या स्वरमंचावर वाजवण्याची संधी मिळेल का, असा विचार मनात होता. आज तो दिवस आला, रसिकांची ही उपस्थिती आनंददायक आहे.
पत्र आणि चित्राद्वारे रसिकांनी व्यक्त केले महोत्सवबद्दल प्रेम
महोत्सवादरम्यान रसिकांमधील मुग्धा कोंडे या किशोरवयीन मुलीने गायक पं. ऋषिकेश बडवे आणि पं. इंद्रायुद्ध मुजुमदार यांचे सादरीकरणादरम्यानचे सुंदर चित्र रेखाटले. तसेच म्युझिक स्टॅम्पस या दालनात सवाई बद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी टपाल माध्यम ठेवलेले आहे. यात श्रोत्यांमधील आनंद साठे यांनी थेट भीमसेन जोशी यांना महोत्सवाचे कौतुक करत तुम्ही हे बदलते स्वरूप पाहायला हवे होतात अशी भावना व्यक्त केली.