सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुण्यात होणार ७९वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव
१० ते १४ डिसेंबर या कालावधीत होणार ७९वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव
पाच दिवस विविध घराण्यांची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार
पुणे: जगप्रसिद्ध हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या परंपरेचा वारसा जपणारा ७९वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा १० ते १४ डिसेंबरदरम्यान पुण्यातील मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे भव्य उत्साहात पार पडणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत यावर्षीच्या महोत्सवातील कलाकारांची घोषणा करताना सांगितले की, यंदा निम्म्याहून अधिक कलाकार प्रथमच सवाईच्या मंचावर सादरीकरण करणार आहेत.
श्रीनिवास जोशी म्हणाले, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरु सवाई गंधर्वांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या या महोत्सवाने आजवर देश-विदेशातील तितकेच नामांकित कलाकार आणि रसिकांना जोडले आहे. अनुभवी दिग्गजांसोबत अनेक नवे, आश्वासक कलाकारांना संधी देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे आणि यंदाही त्या दृष्टीने महोत्सवाची रचना करण्यात आली आहे.
लोकेश आनंद, डॉ. चेतना पाठक, जॉर्ज ब्रूक्स, इंद्रायुध मजुमदार, मेघरंजनी मेधी, डॉ. एल. शंकर यांसह अनेक कलावंत प्रथमच सवाईच्या रंगमंचावर सादरीकरण करणार आहेत. कल्याणी समूह हे यंदाच्या महोत्सवाचे मुख्य प्रस्तुतकर्ते असून किर्लोस्कर समूह, लोकमान्य सोसायटी, मगरपट्टा सिटी ग्रुप, पु.ना. गाडगीळ अॅण्ड सन्स, सुहाना, रांजेकर रिअल्टी आदी प्रायोजकांचे सहकार्य लाभले आहे.
पाच दिवस घराण्यांची समृद्ध परंपरेचा अनुभव
या महोत्सवात पाच दिवस विविध घराण्यांची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार आहे. पहिल्या दिवशी लोकेश आनंद (शहनाई), डॉ. चेतना पाठक, रितेश–रजनीश मिश्रा, पं. शुभेंद्र–सास्किया राव आणि पं. उल्हास कशाळकर सादरीकरण करतील. दुसऱ्या दिवशी हृषिकेश बडवे, इंद्रायुध मजुमदार, पद्मा देशपांडे आणि जॉर्ज ब्रूक्स–पं. कृष्णमोहन भट मंच गाजवतील. तिसऱ्या दिवशी सत्य सोलंकी, श्रीनिवास जोशी, उस्ताद शुजात हुसैन खान आणि डॉ. अश्विनी मिडे-देशपांडे सादर करतील. चौथ्या दिवशी सिद्धार्थ बेलमण्णू, अनुराधा कुबेर, पं. रूपक कुलकर्णी, डॉ. भरत बलवल्ली, कला रामनाथ–जयंती कुमरेश आणि मेघरंजनी मेधी रंग भरतील. शेवटी पं. उपेंद्र भट आणि ‘अध्ये’ सामूहिक गायन होणार आहे.






