सवाई गंधर्व महोत्सवाची सुरुवात (फोटो- टीम नवराष्ट्र)
सनईच्या मंगल सुरावटींनी ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात
पाच दिवसीय महोत्सव मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडासंकुलात होणार
गेली ५१ हून अधिक वर्षे ही परंपरा अव्याहतपणे सुरु
पुणे: सनईच्या मंगल सुरावटी आणि कंठसंगीतासह वादनाचा सहजसुंदर आविष्काराच्या साक्षीने ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची बुधवारी उत्साहात सुरुवात झाली. उद्घाटनाच्या क्षणीच संगीतमय भावावस्था निर्माण करणाऱ्या सनईवादक लोकेश आनंद आणि किराणा घराण्याच्या गायिका डॉ. चेतना पाठक यांच्या सादरीकरणाने महोत्सवाची पहिली संध्या अविस्मरणीय ठरली. आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित हा पाच दिवसीय महोत्सव यंदा मुकुंदनगर (Pune) येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडासंकुलात रंगत आहे. सुमारे दहा हजार रसिकांना सामावणाऱ्या या संकुलात दिवंगत कलाकारांना आदरांजली वाहून स्वरनंदनवनाची नांदी झाली.
यानंतर स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या डॉ. चेतना पाठक यांनी राग ‘भीमवंती’चे माधुर्य खुलवले. ‘गाऊ मै हरीनाम’पासून ‘लागे मोरे नैन’ आणि तराणा या त्रिताल–एकताल रचनांच्या उत्तुंग सादरीकरणाने सभागृह भारावले. ‘बलमा ने चुराई निंदिया’ या दादऱ्याने त्यांनी सादरीकरणाला मोहक विराम दिला. अमेय बिच्चू (हार्मोनिअम), पंडुरंग पवार (तबला) आणि तानपुरा वादकांच्या साथीत त्यांचे गायन अधिक खुलले.
पुण्यनगरीत रंगणार ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’; ‘या’ घराण्यांची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार






