
IISER Pune studied the degradation of grasslands.
या पार्श्वभूमीवर आयसर पुणे येथील आशिष एन. नेर्लेकर, आंद्रे गाइल्स, नॉर्बर्ट हॉल्झेल, लार्स ए. ब्रुडविग यांच्यासह संशोधकांनी हा अभ्यास केला. सहा खंडांमधील २४ संशोधनांमधून ७४२ वनस्पती प्रजातींची माहिती एकत्रित करून त्यांचे विश्लेषण करण्यात आले. जुन्या गवताळ प्रदेशांतील आणि नष्ट झाल्यानंतर पुन्हा विकसित होणाऱ्या गवताळ प्रदेशांतील वनस्पतींच्या कार्यात्मक गुणधर्मांची तुलना करण्यात आली.
पुनर्विकसित गवताळ प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती तुलनेने अधिक उंच असल्याचे आढळले. त्यांच्या पानांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक आणि पानांचे विशिष्ट क्षेत्रफळही जास्त होते. तसेच पानांमधील कोरड्या पदार्थाचे प्रमाण तुलनेने कमी होते. हे सर्व गुणधर्म वनस्पतींना सूर्यप्रकाश, पाणी आणि मातीतील पोषकद्रव्ये वेगाने मिळवून घेण्यास आणि त्याद्वारे जलद वाढ करण्यास मदत करतात. याउलट जुन्या गवताळ प्रदेशांतील वनस्पती संसाधनांचा अधिक काटकसरीने वापर करणाऱ्या आढळल्या. त्या तुलनेने कमी संसाधनांमध्ये टिकून राहण्यास अनुकूल झालेल्या असतात. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या गवताळ प्रदेशांमध्ये वनस्पतींच्या रचनेबरोबरच परिसंस्थेच्या कार्यपद्धतीतही फरक निर्माण होऊ शकतो.
अभ्यासातील सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे वनस्पतींच्या या गुणधर्मांमधील फरक काही दशकांपुरता मर्यादित नसून शंभर वर्षांहून अधिक काळ टिकू शकतो. त्यामुळे एखादा गवताळ प्रदेश नष्ट झाल्यानंतर पुन्हा गवत आणि इतर वनस्पती वाढू लागल्या, तरी त्याची मूळ कार्यात्मक वैशिष्ट्ये तातडीने परत येत नाहीत. या बदलांमुळे पोषकद्रव्यांचे चक्र अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. परिणामी पुनर्स्थापित गवताळ प्रदेशांची परिसंस्थात्मक कार्यपद्धती मूळ, जुन्या गवताळ प्रदेशांपेक्षा वेगळी राहू शकते.
आई शप्पथ! 23% पावसाचे थेंब जमिनीवर पोहोचण्याआधीच…; ‘ IITM ‘च्या संशोधनातून निष्कर्ष
संवर्धनाला अधिक महत्त्व
गवताळ प्रदेशांच्या पुनर्स्थापनेसाठी या निष्कर्षांचा उपयोग होऊ शकतो. पुनर्स्थापना करताना केवळ वनस्पतींची संख्या किंवा हिरवाई वाढविण्याऐवजी जुन्या गवताळ प्रदेशातील विशिष्ट वनस्पती प्रजाती, त्यांचे गुणधर्म आणि परिसंस्थेतील त्यांची भूमिका यांचा विचार करणे आवश्यक असल्याचे अभ्यासातून सूचित होते. जुने गवताळ प्रदेश नष्ट झाल्यानंतर त्यांची जैवविविधता आणि वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती समुदाय पुन्हा निर्माण होण्यास मोठा कालावधी लागू शकतो. त्यामुळे नष्ट झालेल्या गवताळ प्रदेशांच्या पुनर्स्थापनेइतकेच उर्वरित जुन्या गवताळ प्रदेशांचे थेट संवर्धन करणे अधिक प्रभावी ठरू शकते.