
हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; 'हा' टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
पिंपरी : राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये दररोज ये-जा करणाऱ्या सुमारे पाच लाख कर्मचाऱ्यांची जीवघेण्या वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या हिंजवडी मेट्रो प्रकल्पाची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. बहुतांश कामे आणि तांत्रिक चाचण्या पूर्णत्वाकडे असतानाही, केवळ औपचारिक लोकार्पण आणि प्रशासकीय कारणांमुळे मेट्रो सेवेचा शुभारंभ लांबणीवर पडल्याने दररोज तासनतास प्रवासात अडकणाऱ्या आयटी अभियंत्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
निवडणूक आचारसंहिता किंवा पितृपक्षासारखी कारणे पुढे करून सार्वजनिक वाहतुकीची अत्यावश्यक सुविधा रोखून धरणे अयोग्य असल्याचे मत कर्मचारी व्यक्त करत आहेत. “शासकीय करवसुली कोणत्याही कारणाने थांबत नाही; मग नागरिकांच्या सोयीसाठी उभा राहिलेला प्रकल्प सुरू करण्यास विलंबाचे कारण काय?” असा सवाल आयटीयन्स उपस्थित करत आहेत.
वाहतूक कोंडीमुळे नोकरदार त्रस्त
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम मार्गी लागल्याने परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची आशा होती. मात्र, केवळ औपचारिक उद्घाटन सोहळ्याच्या प्रतीक्षेत हा मार्ग रखडला असल्याची भावना निर्माण झाली आहे. सध्या रस्त्यांवरील खड्डे, अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांचे दररोज २ ते ३ तास केवळ प्रवासात खर्ची पडत आहेत. यामुळे इंधनाचा अपव्यय आणि प्रदूषण तर वाढतच आहे, शिवाय कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही त्याचा गंभीर परिणाम होत आहे. अशा स्थितीत मेट्रो सेवा तातडीने सुरू करणे गरजेचे असल्याचा सूर उमटत आहे.
१२ स्थानकांचा पहिला टप्पा सुरू करण्याची मागणी
संपूर्ण २३ स्थानकांचे काम पूर्ण होण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा ज्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे, तो भाग प्रवाशांसाठी तात्काळ खुला करावा, असा पर्याय आता पुढे केला जात आहे. किमान बालेवाडी ते हिंजवडी हा १२ किलोमीटरचा टप्पा तातडीने सुरू केल्यास आयटी पार्कमधील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो. कोणत्याही औपचारिक सोहळ्याशिवाय किंवा व्हीआयपी उद्घाटनाची वाट न पाहता मेट्रो सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल व्हावी, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.
“हिंजवडी मेट्रो मार्गावरील किमान १२ स्थानकांचा (सुमारे १२ किमी) टप्पा प्रवाशांसाठी तातडीने खुला करावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. हा टप्पा सुरू झाल्यास आयटी पार्क आणि बालेवाडी परिसरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल. संपूर्ण २३ स्थानके एकाच वेळी सुरू करण्याच्या अट्टाहासापायी प्रकल्प आणखी महिने लांबणीवर पडता कामा नये. नियमांचा किंवा मुहूर्ताचा दाखला न देता, आचारसंहिता संपताच पूर्ण झालेली १२ स्थानके जनतेच्या सेवेत दाखल करावीत.” — पवनजीत माने, आयटी अभियंता.