
मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या अनेक रेल्वे हडपसरपर्यंतच धावणार; प्रवाशी संघटना आक्रमक
दरम्यान, अमरावती-पुणे गाडीला वगळता महाराष्ट्रातून खासकरून मराठवाडामार्गे पुण्यात येणाऱ्या बहुतेक सर्वच गाड्या हडपसरपर्यंतच मर्यादित करण्यात आल्या आहेत. माजी केंद्रीय रेत्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नांदेड-पुणे नियमित एक्स्प्रेस हडपसरहून पुणे जंक्शनपर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पुणे विभागाच्या नवीन प्रस्तावानुसार रेल्वे बोर्डाने पुन्हा हा निर्णय मागे घेतला असून, गाडी हडपसरवरच थांबवण्याचा मार्ग निवडला आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासन ‘लाइन मिळत नाही, शंटिंगची अडचण’ अशी कारणे देत असले तरी राजस्थान-गुजरात-उत्तर भारतातून येणाऱ्या गाड्या जेजुरीपर्यंत कुठेही स्टॅबल करून ठेवतात. मग, मराठवाड्याच्या गाड्यांसाठीच अडथळे कसे? असा प्रश्न संघटनांनी उपस्थित केला आहे. तळेगाव किंवा खडकी येथे पर्यायी व्यवस्था करू शकतो, असेही प्रवासी संघटनांचे मत आहे.
पहाटे उतरणाऱ्या प्रवाशांना ऑटो मिळणे अवघड
नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसर येथे पहाटे ४.३० वाजता पोहोचते. यावेळी त्या परिसरात कोणतीही पुणे महानगर पालिकेची बस सेवा नाही. त्याचबरोबर खासगी वाहने अव्वाची सव्वा भाडे आकारतात. पिंपरी-चिंचवड, शिवाजीनगर, स्वारगेट, मनपा, खराडी याठिकाणी जाण्यासाठी थेट कनेक्टिव्हिटी नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होणार आहेत. तसेच वृद्ध, महिला, विद्यार्थी आणि दररोज पुण्यात नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या शेकडो मराठवाड्यातील प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.
हे सुद्धा वाचा : भाजपमधील इच्छुकांचे आरक्षण साेडतीकडे लक्ष; पुण्याचा महापौर कोण होणार?
दोन्ही गाड्या मराठवाडा विभागातील प्रवाशांसाठी उपयुक्त
नांदेड विभागातून पुणे शहरासाठी दररोज फक्त २ गाड्या आहेत. मराठवाडा विभाग हा काहीसा मागासलेला भाग आहे, त्यामुळेच मराठवाड्यातील बहुतेक लोक पुणे आणि आसपासच्या परिसरात नोकरी करतात, तसेच मराठवाडा विभागातील विद्यार्थीही शिक्षणासाठी पुणे आणि उपनगरीय भागात राहतात. त्यामुळे या दोन्ही गाड्या मराठवाडा विभागातील प्रवाशांसाठी खूप उपयुक्त आहेत, असे प्रवाशी संघटनांनी सांगितले.