सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुरू असलेल्या प्राध्यापक पदासाठी तब्बल एक कोटी रुपयांचा ‘रेट’ सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे, तर खासगी महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरतीसाठी ५० ते ६० लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. पेपरफुटीच्या प्रश्नावर प्राध्यापक, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्राध्यापक भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या एपीआय/एटीआर गुणांकनातही गैरप्रकार होत असल्याचा आरोप पवार यांनी केला. पात्रतेच्या निकषांनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जात असले, तरी प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी गुण देताना भेदभाव केला जात असल्याचे त्यांनी म्हटले. चांगला एटीआर असलेल्या उमेदवारांना कमी गुण, तर एटीआरमध्ये तुलनेने कमी कामगिरी असलेल्या उमेदवारांना मुलाखतीत अधिक गुण दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यापीठ प्रशासनाच्या विचारसरणीशी किंवा सत्ताधारी राजकीय व्यवस्थेशी जवळीक असलेल्या उमेदवारांना मुलाखतीत अधिक गुण दिले जात असल्याचा दावाही पवार यांनी केला.
प्राध्यापक भरतीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत आर्थिक व्यवहार, गुणांकनातील कथित फेरफार, बनावट प्रमाणपत्रे आणि राजकीय हस्तक्षेपाचे आरोप गंभीर आहेत. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
गेस्ट लेक्चररच्या पात्रतेवरही प्रश्नचिन्ह
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये काही गेस्ट लेक्चररकडे नेट किंवा सेटसारखी आवश्यक पात्रता नसतानाही विद्यार्थ्यांना अध्यापनाची जबाबदारी दिली जात असल्याचा आरोप पवार यांनी केला. अशा प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असून, संबंधित नियुक्त्यांचीही तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली.






