पुणे: इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेतील इन-हाऊस कोट्यासंदर्भातील नव्या सुधारीत नियमांमुळे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणे कठीण झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सांगत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी हा नियम तात्काळ रद्द करून पूर्वीच्या नियमांप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवण्याची मागणी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, उपसंचालक, उच्च माध्यमिक, पुणे विभाग, आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक), पुणे जिल्हा परिषद, पुणे. यांच्याकडे केली आहे.
राज्यात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सर्व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये इ. ११ वी प्रवेश प्रक्रिया केंद्रीकृत ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. या प्रक्रियेत कनिष्ठ महाविद्यालयांना इन-हाऊस कोट्यांतर्गत ५ टक्के जागा राखीव ठेवून प्रवेश द्यावा लागणार आहे. मात्र नव्या नियमांनुसार इन-हाऊस कोट्यात प्रवेश मिळवण्यासाठी संबंधित संस्थेची माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय एकाच संकुलात असणे अनिवार्य ठरवण्यात आले आहे.
यापूर्वी एकाच संस्थेची माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय वेगवेगळ्या ठिकाणी असली तरी त्या संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याच संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात इन-हाऊस कोट्यातून प्रवेश घेणे शक्य होते. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना शहरातील दर्जेदार शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळत होती.
सध्याच्या सुधारीत नियमांमुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेता येणार नाही. संस्थांनाही आपल्याच विद्यार्थ्यांसाठी राखीव इन-हाऊस कोट्यातील ५ टक्के जागा भरता येणार नाहीत. त्यामुळे या बदलामुळे ग्रामीण भागातील आणि गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे डॉ. गजानन एकबोटे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार सुनिल कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी देखील विद्यार्थ्यांच्या हितासाठी या सुधारीत नियमाचा पुनर्विचार करून तो रद्द करण्याची आणि पूर्वीप्रमाणेच इ. ११ वी प्रवेश प्रक्रिया राबविण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
11th admission: ११ विची प्रवेशप्रक्रीया पुन्हा नव्याने आजपासून सुरु; कसा भरायचा फॉर्म? जाणून घ्या
अकरावीत प्रवेश घेणाऱ्यांनो ‘या’ तारखा लक्षात ठेवा