Photo Credit- Social Media पहलगाम हल्ल्यातील 'त्या' दोघांचे पार्थिव आज रात्री पुण्यात आणणार
पुणे, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला असून, याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोन पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान अद्यापही पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील ३५६ पर्यटक पहलगाम / जम्मू काश्मीर मध्ये अडकले आहेत. यापैकी ८४ जणांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पहलगाम / जम्मू काश्मीर येथे अडकलेल्या पुण्यातील पर्यटकांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाला पाठविली आहे.दहशतवादी हल्ला झाल्यावर प्रारंभी पुण्यातील पर्यटक सुरक्षित असल्याचे कळले होते. तर दोन पर्यटक जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. संतोष जगदाळे व कौस्तुभ गनबोटे हे या पर्यटकांचे नाव आहे. हे दोघे गंभीर जखमी झाल्यानंतर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे रात्री उशिरा सांगण्यात आले.
संतोष जगदाळे (वय ५४) व कौस्तुभ गनबोटे (वय ५६) हे दोघे मित्र कुटुंबीयांसमवेत कमिन्स कंपनीतील आपल्या मित्रपरिवारासह तीनच दिवसांपूर्वी काश्मीर सहलीला गेले होते. दुपारी ते पहलगाम पाहण्यासाठी गेले असता अचानक आलेल्या दहशतवाद्यांनी जगदाळे यांची मुलगी आसावरी हिच्यासमोर नावे विचारत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले.रात्री उशिरा उपचार सुरू असताना संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. जगदाळे कुटुंबीय कर्वेनगर परिसरात राहतात. गोळीबार झाला तेव्हा जगदाळे यांची पत्नी प्रगती व गनबोटे यांच्या पत्नी संगीताही थोड्याच अंतरावर होत्या. या घटनेने आसावरीसह या दोघींनाही जबर मानसिक धक्का बसला आहे.
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात आले. तर पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव हे सायं. ६ वाजता निघेल आणि पुण्यात आणण्यात येईल. पुणे विमानतळावर मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पहलगाम / जम्मू काश्मीर येथे पुणे जिल्ह्यातील कोणी व्यक्ती (पर्यटक) असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनास कळवावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांनी केले आहे. सदर माहिती हेल्पलाईन / संपर्क क्रमांक :- 020-26123371 / 9370960061 / 8975232955 / 8888565317 देता येईल