
PMRDA ची मोई येथे विक्रमी कारवाई; 680 अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त, 35 हेक्टर क्षेत्र अतिक्रमणमुक्त
चाकण / अतिश मेटे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) खेड तालुक्यातील मोई परिसरात अनधिकृत पत्राशेड आणि अतिक्रमणांवर आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई करण्यात आली. यात सलग दोन दिवसांत तब्बल ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त केली गेली. या कारवाईत सुमारे ३५ हेक्टर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले असून, बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ व १४ जुलै रोजी ही व्यापक मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन केले होते. या मोहिमेसाठी ६५० पोलीस अधिकारी व कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (एमएसएफ) ५० जवान, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सुरक्षा रक्षक तसेच पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाचे ३० दक्षता अधिकारी तैनात करण्यात आले होते.
मोठी बातमी ! पुण्यात ATS कडून 65 ठिकाणांवर छापेमारीची कारवाई; तब्बल 50 जणांची पोलिसांकडून चौकशी
याशिवाय, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, महावितरणचे कर्मचारी आणि अन्य यंत्रणा घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. अनधिकृत पत्राशेड हटविण्यासाठी जेसीबी, पोकलेन मशीन आणि मजुरांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिका, खेड येथील विद्युत पुरवठा विभाग, आरोग्य विभाग आणि खेड पंचायत समिती यांच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची उपस्थिती
कारवाईच्या अंमलबजावणीसाठी पीएमआरडीएचे दक्षता अधिकारी तथा पोलीस अधीक्षक अमोल झेंडे, पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढमाळे, पीएमआरडीएचे सहआयुक्त हिम्मत खराडे, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, तहसीलदार रवींद्र रांजणे, तहसीलदार आशा होळकर, उपअभियंता रितेश मुंढे व तपन डंके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी दोन्ही दिवस घटनास्थळी उपस्थित होते.
अतिक्रमणांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार
मोई परिसरातील अनधिकृत बांधकामांवर झालेल्या या विक्रमी कारवाईमुळे बेकायदेशीर पत्राशेड उभारणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, भविष्यातही अशा अतिक्रमणांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.