
Satara encroachment Ravivar Peth 30 illegal stalls removed
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेपासून तहसीलदार कार्यालयापर्यंत जाणाऱ्या मार्गावर टपऱ्यांची संख्या वाढत गेल्याने सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला होता. रस्त्याच्या जागेवरून दोन गटांमध्ये आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादाने या अतिक्रमणांचा प्रश्न अधिकच चिघळला. त्यानंतर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. स्वीकृत नगरसेविका शिवानी कळसकर यांनी मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याकडे अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली. पोलिसांनीही याबाबत पालिकेला पत्रव्यवहार केला होता.
या तक्रारी आणि वाढत्या तणावाची दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटाव विभागाला कारवाईचे आदेश दिले. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन जेसीबी, एक डंपर, १७ कर्मचारी आणि पोलिसांच्या फौजफाट्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या टपऱ्या हटविण्यास सुरुवात झाली. सुमारे ३० टपऱ्या ताब्यात घेऊन जप्त करण्यात आल्या. टपरीधारकांना स्वतःहून साहित्य हलविण्याची संधीही देण्यात आली.
मुख्याधिकारी विनोद जळक, अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम आणि विभागप्रमुख शैलेश अष्टेकर यांनी कारवाईवर देखरेख ठेवली. संभाव्य विरोध आणि वादाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अतिक्रमण हटले; आता सातत्याची कसोटी!
एका रस्त्यावरील ३० टपऱ्या हटवून पालिकेने कारवाईचा प्रारंभ केला असला, तरी संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त होण्यासाठी आणखी प्रयत्नांची गरज आहे. कासट मार्केटच्या मागील रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अद्याप अतिक्रमणे कायम आहेत. पालिकेचे भाडेकरू असलेल्या काही टपऱ्या वगळता इतर अतिक्रमणेही पुढील दोन दिवसांत हटविण्यात येतील, असे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सांगितले. त्यामुळे पालिकेची मोहीम प्रत्यक्षात किती व्यापक होते, हे आगामी कारवाईतून स्पष्ट होणार आहे.
७४९ टपऱ्यांचा प्रश्न; पुनर्वसनाचे नियोजन कागदावरच?
शहरात फेरीवाला धोरण समितीच्या नियमानुसार ७४९ टपऱ्यांची नोंद आहे. या व्यावसायिकांसाठी सात स्वतंत्र हॉकर्स झोन निश्चित केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. संबंधित फेरीवाल्यांचे या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र, रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविताना पर्यायी जागा, व्यवसायाची सोय आणि पुनर्वसनाची अंमलबजावणी या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
अतिक्रमण हटविणे ही तात्पुरती कारवाई ठरू नये. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांबाबत समान निकष लावून कायमस्वरूपी नियोजन करणे, हेच पालिका प्रशासनासमोरील खरे आव्हान आहे.
Ans: रविवार पेठेतील कासट मार्केटच्या मागील बाजूने तहसीलदार कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या सुमारे ३० अनधिकृत टपऱ्या पालिकेने हटवल्या.
Ans: रस्त्यावर टपऱ्यांची संख्या वाढल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच रस्त्याच्या जागेवरून दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर अतिक्रमणांचा मुद्दा अधिक गंभीर बनला.
Ans: पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार शहरात सात हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले असून, नोंदणीकृत फेरीवाल्यांचे या ठिकाणी पुनर्वसन करण्याचे नियोजन आहे.