सौजन्य फोटो - AI Gemini
प्रयाग आश्रु कोकळे (वय ७५, रा. दिंडेवाडी, चितळी शिवार) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. त्या बुधवारी (दि. ४) दुपारी चितळी-आव्हाणा रस्त्यालगत आपल्या शेळ्या राखत होत्या. याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांच्याजवळ येऊन पाथर्डीला जाण्याचा रस्ता विचारला. वृद्ध महिला त्यांना अत्यंत सहजपणे रस्ता सांगत असतानाच, भामट्यांनी संधी साधून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने अचानक हिसकावण्यास सुरुवात केली.
चोरट्यांनी महिलेच्या कानातील सोन्याचे वेल जोरात ओढल्यामुळे त्यांच्या कानाला गंभीर दुखापत होऊन पाळी फाटली. एवढ्यावरच न थांबता एका नराधम चोरट्याने त्यांच्या तोंडावर जोरात बुक्की मारली, ज्यामुळे त्यांचा एक दातही खाली पडला. या अमानुष मारहाणीनंतर तिघेही चोरटे सुमारे ४३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन दुचाकीवरून सुसाट पसार झाले. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या जबरी चोऱ्यांना आळा कसा घालायचा, असा गंभीर सवाल पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.






