पुणे महानगरपालिका 274 ठिकाणी करणार सुरक्षेचे उपाय (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: शहर पोलिसांनी शहरातील २७४ निर्जन ठिकाणांची यादी महापालिकेला पाठवली असून या ठिकाणी उपाय योजना करण्याच्या सूचना पत्राद्वारे केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या वतीने पोलिसांनी सूचविलेल्या ठिकाणी पथदिवे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे विद्युत विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
बोपदेव घाटातील अत्याचारांच्या घटनेनंतर शहरातील निर्जन स्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बोपदेव घाटात एक मुलीवर आत्याचाराची घटना घडली होती. ते प्रकरणामुळे पुण्यातील निर्जन स्थळावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शहरातील निर्जन स्थळांवर रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन लुटमार कींवा अत्याचाराच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयाकडुन पोलीस ठाण्यांच्या हद्दीनुसार निर्जनस्थळांची पाहणी करण्यात आली होती. तरुणी, महिलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शहरातील २७४ निर्जन स्थळांवर धोका असल्याचे निदर्शनास आले . त्यानुसार पोलिसांनी या २७४ निर्जन ठिकाणी पथदिवे, सीसीटीव्ही बसविण्याबाबत महापालिका प्रशासनास पत्र देण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेच्या विद्युत विभागाकडून उपाय योजना केल्या जात आहेत.
पोलिसांनी दिलेल्या यादीमध्ये काही जागा या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील आहेत, तर काही जागा या वनविभागाच्या अखत्यारित येतात.तसेच काही मोकळ्या जागा या खाजगी मालकीच्या आहेत अशा ठिकाणी महापालिकेला स्वतःच्या खर्चाने त्या जागेत काम करता येत नसल्याने तेथे संबंधितांशी संपर्क साधून पुढील कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती ही महापालिकेने पुणे पोलिसांना केली आहे.
महापालिकेने काय केले….
– शहरात १ लाख ९३ हजार ३६४ इतके पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्यापैकी प्रकाश कमी असणाऱ्या ठिकाणी पथदिवे बदलण्याची कामे सुरु आहेत.
– बोपदेव घाटामध्ये अपुरी प्रकाश व्यवस्था असल्याचे महापालिकेस निदर्शनास आल्यानंतर, महापालिकेने तेथे तत्काळ १८ वीजेचे खांब उभे करुन प्रकाश व्यवस्था केली.
– तळजाई पायथा ते तळजाई मंदिर परिसरात प्रकाश व्यवस्थेसाठी ६३ विजेचे खांब उभारण्यात आले आहेत.
– सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत यावर्षी नवीन उच्च कार्याक्षमता असलेल्या ८९५० दिवे बसविण्यात आले.
– धनकवडी – सहकारनगर, वारजे – कर्वेनगर आणि कोंढवा – येवलेवाडी या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतही टप्प्याटप्प्याने नवीन प्रकाश व्यवस्था बसविण्याचे काम सुरु आहे.
– समाविष्ट गावांमध्ये यावर्षी १७४८ विजेचे खांब बसवुन प्रकाश व्यवस्था करण्यात आली.
पोलिस प्रशासनाकडून आलेल्या पत्रानुसार पथदिवे व सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले अहे. उर्वरीत काम लवकरच पूर्ण होईल. तसेच पथदिव्यांचा पुरेसा प्रकाश पडण्यासाठी ६७७ झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली अहे. समाविष्ट गावांमध्ये नवीन वर्षात १ हजार ६६६ इतके विजेचे खांब बसविले जाणार आहेत.
– मनीषा शेकटकर,
मुख्य अभियंता, विद्युत विभाग, महापालिका.