बोपदेव घाट अत्याचार प्रकरण (फोटो टीम नवराष्ट्र)
पुणे: राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढत चाललं आहे. पुण्यात एक दिवसाआड महिला अन् मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येताना आपल्याला दिसत आहे. पुण्यातील बोपदेव घाटामध्ये ३ ऑक्टोबर रोजी तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. कोंढवा सासवड रस्त्यावरील बोपदेव घाटात एका विद्यालयीन युवतीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली असून यामुळे संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर या राज्यात पोलीस यंत्रणा आहे का ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. बोपदेव घाटात मारामाऱ्या, लुटमार, विनयभंग, चोऱ्या असे प्रकार वारंवार घडत असताना पोलिसांचे घाटाकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे जाणवत आहे. बोपदेव घाट पूर्णपणे पुणे पोलिसांच्या हद्दीत असून नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस मदत केंद्र उभारले आहे, मात्र त्याकडे एकही पोलीस कर्मचारी साधे ढुंकूनही पाहत नसल्याने मदत केंद्र म्हणजे केवळ शोभेची वस्तू ठरली आहे.
बोपदेव घाट आणि परिसरात स्वच्छ हवा आणि प्रसन्न वातावरण असल्याने घाटात पहाटेपासुन गर्दी होते. विशेषता पुणे परिसरातील नागरिक, युवक, युवती मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र शहरात परजिल्ह्यातून आणि परराज्यातून शिक्षणासाठी आलेले युवक युवती सायंकाळ नंतर विशेष गर्दी करीत असतात. विशेष म्हणजे फिरण्यास आलेले युवक युवती एका गावातील किंवा भागातील नसल्याने कुणी ओळखीचा भेटण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे अगदी रात्री एक, दोन ते पहाटे पर्यंत असतात. यातील बहुतेक जोडपी मद्यप्राशन करताना सर्रासपणे दिसून येत आहेत. त्याच काळात लुटमार करण्यासाठी शोधात असलेल्या व्यक्तींना आयते सावज सापडते आणि त्यातूनच अनेक घटना घडल्या आहेत.
बोपदेव घाटात कॉलेजच्या तरुण तरुणींना लुटण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही वर्षापूर्वी एका साध्या वेशातील पोलीस कर्मचारी त्याच्या मैत्रिणीसोबत फिरण्यास आलेला असताना चाकूच्या धाकाने सोने चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम लुटल्याची घटना घडली आहे. परंतु सत्यप्रकार सांगितला तर घरच्यांना समजल्यावर आपले काय होईल ? या भीतीपोटी देवाच्या दर्शनासाठी जात असताना घटना घडल्याचे खोटेच सांगितले जाते. वर्षभरात कित्येकवेळा असे प्रकार होत असताना त्याकडे गांभीर्यपूर्वक पाहिले जात नसल्याचे दुर्दैव आहे.
हेही वाचा: बोपदेव घाटातील अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट; CCTV फूटेज आलं समोर
पोलीस मदत केंद्रातच चालतात युवक युवतींचे अश्लील चाळे
बोपदेव घाट आणि परीसरात तरुण तरुणींना हाणमार करून लुटण्याचे प्रकार सर्रास होत होतात. तसेच संपूर्ण घाट पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत असल्याने घाटाच्या पायथ्यालगत पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र दिवसा आणि रात्रीही पोलीस कर्मचारी फारसे घाटाकडे फिरकताना क्वचितच दिसतात. तसेच जे मदत केंद्र उभारण्यात आले आहे, त्यामळे आपत्कालीन प्रसंगी मदत मिळण्याची कोणतीही सुविधा अथवा महत्वाचे संपर्क नंबर नाहीत. केवळ एक पत्र्याचे शेड उभारले आहे. याठिकाणी कर्मचारी फिरकत नसल्याने असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती आहे. त्यामुळे फिरायला येणारे युवक युवती रात्रीच्या वेळी याच मदत केंद्रात अश्लील चाळे करताना अनेकदा आढळून आले आहे.
पुरंदर तालुक्यात प्रवेश करताना सर्व बाजूने घाट पार करूनच यावे लागते. त्यातील बोपदेव आणि दिवे घाट पुणे पोलिसांच्या हद्दीत आहे. गराडे जवळील मरीआई घाट भोर तालुका ( राजगड पोलिस ) हद्दीत आहे. त्याचबरोबर सासवड वरून भोरकडे जाताना लागणारा चीव्हेवाडी घाट, वीर गावाकडे जाणारा पांगारे घाट, काळदरी कडे जाताना पानवडी घाट हे तीन घाट पूर्णपणे सासवड पोलिसांच्या हद्दीत आहेत. परंतु कोणतीही घटना घडली कि, प्रथम सासवड पोलिसांना हजर व्हावे लागते. या घाटांचा पुरंदर तालुक्याशी थेट संपर्क असल्याने रात्रीची गस्तही सासवड पोलीस करीत असतात. मात्र त्याप्रमाणात पुणे पोलिसां कडून अपेक्षित मदत आणि दक्षता घेतली जात नसल्याने कमी संख्याबळ असताना सासवड पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामळे ग्रामीण पोलीस अधीक्षक याकडे गांभीर्याने पाहणार का ? हा प्रश्न आहे.