
पुणे शहरात कडाक्याची थंडी कायम
यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद
महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट कायम
पुणे: महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट कायम असून पुणे शहरात या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रासह पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसरला.
गुरुवारी पुण्यात किमान तापमान ७.९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. पहाटेच नव्हे तर दिवसभर हवेत गारवा जाणवत होता. निरभ्र आकाश आणि कोरडे वातावरणामुळे थंडीचा कडाका अधिक तीव्र झाला. उपनगरांमध्ये तर गारठा अधिक जाणवला. दिवसभरातील कमाल तापमान २८.७ अंश सेल्सिअस होते.
पुणेकरांनो रिलॅक्स! शहरात थंडीचा जोर ओसरला; मात्र पुढील दोन दिवस…
थंडीचा आनंद लुटण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने सकाळी व संध्याकाळी टेकड्या, उद्यानांकडे धाव घेत आहेत. तर हौशी पुणेकर वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर, शाल, जर्किन परिधान करून थंडीत फिरण्याचा आनंद घेत आहेत. उपनगरांतील सोसायट्या, दुकानदार आणि सुरक्षारक्षक शेकोट्या पेटवून ऊब घेताना दिसत आहेत.
शुक्रवारी (दि. १२) पुणे आणि परिसरात किमान तापमान ८.३ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पाषाण भागात यंदाचे नीचांकी ७.७ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले.
Pune News: पुण्यात हुडहुडी! शहरातील तापमानात कमालीची घट; थंडीचा कडाका वाढला
भारतीय हवामान विभागानुसार, पुढील काही दिवस पुण्यात किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खालीच राहण्याची शक्यता असून शनिवारी आणि रविवारी किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमानात किंचित वाढ होऊ शकते, परंतु थंडी कायम राहणार आहे. तसेच पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळच्या वेळी विरळ धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात नुसती हुडहुडी अन् कुडकुडी
उत्तर भारतातून येणाऱ्या गार वाऱ्यांचा जोर वाढल्याने महाराष्ट्रातील तापमानात मोठी घसरण झाली आहे. राज्यातील अनेक शहरांत किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा त्याखाली नोंदवले जात आहे. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १५ अंश, तर माथेरानमध्ये १७ अंश इतकी नोंद झाली. अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक थंडी जाणवत असून येथे पारा ६.६ अंशांवर घसरला आहे. सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद याच जिल्ह्यात झाली आहे.
Maharashtra Weather News update: राज्यात नुसती हुडहुडी अन् कुडकुडी! अनेक शहरांत तापमान १० अंशांखाली
पुणे आणि नाशिकमध्येही तापमान ७ ते ८ अंशांपर्यंत खाली आले आहे. हवामान विभागाचा अंदाज आहे की उत्तर भारतातून वेगाने येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवस राज्यात थंडीची लाट कायम राहणार आहे. मध्य, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत पाऱ्याची घसरण यापुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.