
पोलिसांकडून तक्रारदारांना टोलवाटोलवी! आयुक्तांनी केली पोलखोल; डमी तक्रारदार पाठवला अन्...
पुणे : पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांना पोलिसांकडून नेमकी कशी वागणूक दिली जाते, तक्रारीची दखल किती गांभीर्याने घेतली जाते आणि मदतीसाठी आलेल्या नागरिकाला किती तत्पर प्रतिसाद मिळतो, याची थेट पोलखोल पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीच केली आहे. नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणाबाबत पोलिस दलाला वारंवार सूचना देऊनही प्रत्यक्षात परिस्थिती बदलली नसल्याचे समोर आल्यानंतर आयुक्तांनी चक्क डमी तक्रारदार पोलिस ठाण्यात पाठवून ‘रिअॅलिटी चेक’ केली. त्यात चार पोलिस ठाण्यातील टोलवाटोलवीचा पंचनामा करण्यात आला आहे. या वरिष्ठ निरीक्षकांना आयुक्तांनी ताशेरे ओढण्याची शिक्षा सुनावली आहे.
पुणे शहरातील मार्केटयार्ड, अलंकार, स्वारगेट आणि डेक्कन पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांवर ही कारवाई झाली आहे. चार पोलिस ठाण्यात अचानक डमी तक्रारदार पाठवून वाहन चोरी आणि मोबाईल हिसकावल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. यावेळी संबंधित पोलिस ठाण्यांतील पोलिसांचा प्रतिसाद, तक्रार नोंदविण्याची कार्यपद्धती व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपलब्धता तपासण्यात आली आहे. या तपासणीत काही ठिकाणी तक्रारदाराला तातडीची मदत देण्याऐवजी ऑनलाईन तक्रारीचा सल्ला, तर काही ठिकाणी ‘उद्या या’ अशी बोळवण आणि कागदपत्रांची सबब पुढे करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या रियालटी चेकनंतर पोलिस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढणे ही शिक्षा दिली आहे. गंभीर स्वरूपाची तक्रार घेऊन नागरिक पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्याला पुन्हा ऑनलाईन प्रक्रियेकडे पाठविणे कितपत योग्य, असा सवाल या प्रकारामुळे उपस्थित झाला आहे.
हे सुद्धा वाचा : अनैतिक संबंधातून वाद, महिलेचा भरदिवसा खून; पन्हाळा तालुक्यातील घटनेनं खळबळ
नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घ्या
या चारही प्रकरणांतून पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराला तातडीने मदत मिळतेच असे नाही, हे आयुक्तांच्या या ‘रिअॅलिटी चेक’मधून स्पष्ट झाले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना ताशेरे ओढणे ही शिक्षा देत नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेण्याची आणि तत्काळ प्रतिसाद देण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. आयुक्तांनी सुरू केलेल्या या तपासणीमुळे पोलिस दलात मात्र, खळबळ उडाली आहे.