
पुणेकरांनो तयारी ठेवा, महापौरांनी मागविला अहवाल; सेव्ह वॉटर मोहीम राबविणार
पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, मान्सूनचे आगमनही लांबल्याने पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा नियोजनाचा सविस्तर अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश देतानाच पाणी कपातीची तयारी करण्याच्या सूचना महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे सोमवारपासून पाणी कपात लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापौर नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “सोमवारपासून पाणी कपातीची अंमलबजावणी करण्याच्या मनस्थितीत आम्ही आलो आहोत. याबाबतचे अंतिम परिपत्रक पुढील दोन दिवसांत महापालिका आयुक्त नवल किशोर राम जारी करतील.” पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग सेंटर्स, स्विमिंग पूल तसेच बांधकाम मजुरांच्या कॅम्पसाठी वापरले जाणारे पिण्याचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याशिवाय शहरभर ‘सेव्ह वॉटर’ मोहीमही राबविण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
सर्वपक्षीय बैठकीत पाणी व्यवस्थापनावर चर्चा
‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जून महिना सुरू होऊनही पुणे शहर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा नियोजन आणि संभाव्य पाणी कपातीबाबत महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते निलेश निकम, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनित कौर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खडकवासला धरणसाखळीत केवळ ५.१ टीएमसी पाणीसाठा
महापौर नागपुरे म्हणाल्या की, धरणातील उपलब्ध पाणीसाठा प्रामुख्याने पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात येत आहे. खडकवासला धरणसाखळीत सध्या केवळ ५.१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाला आणखी विलंब झाल्यास पाणीपुरवठ्यावर निर्बंध आणणे अपरिहार्य ठरणार आहे. पुणे शहराला दररोज सुमारे १५०० एमएलडी पाण्याची आवश्यकता असते. उपलब्ध साठ्यातील सुमारे ३ टीएमसी पाणी शहराच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.महापालिका प्रशासन एक दिवसाआड पाणीपुरवठा, स्विमिंग पूल भरण्यास बंदी, बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याच्या वापरावर निर्बंध तसेच व्यावसायिक वापरावर नियंत्रण यासारख्या पर्यायांवर विचार करत आहे.
पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कडक नियम
पिण्याचे पाणी वापरून वाहन धुणे आणि स्विमिंग पूल चालवण्यावर पूर्ण बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. शहरात दररोज सुमारे ३०० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. बांधकाम व्यावसायिक आणि लेबर कॅम्पसाठी याच पाण्याचा वापर अनिवार्य करण्यात येणार आहे. काही बांधकाम प्रकल्पांमध्ये बोरवेलचे पाणी वापरत असल्याचे दाखवून प्रत्यक्षात पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याची तक्रार आहे. अशा ठिकाणी महापालिकेची भरारी पथके अचानक तपासणी करणार आहेत. सार्वजनिक आणि खासगी बागांमध्ये केवळ पुनर्प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.
दिवसाआड पाणीपुरवठ्याचे तांत्रिक आव्हान
दिवसाआड पाणीपुरवठा करताना अनेक भागांमध्ये पाईपलाईनमध्ये हवा कोंडणे आणि व्हॅक्युम निर्माण होण्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. यावर उपाय म्हणून ज्या दिवशी पाणीपुरवठा होईल, त्या दिवशी अतिरिक्त दाबाने पाणी देण्याचे विशेष मॉडेल प्रशासनाने तयार केले आहे. त्यामुळे नागरिकांना पुढील दिवसासाठी पाणी साठवून ठेवणे शक्य होईल, अशी माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
पाणीसाठ्याचे गणित
“धरणातील सध्याचा उपयुक्त साठा केवळ ३ टीएमसी असून तो पुढील तीन महिने पुरेसा ठरणार नाही. हा केवळ तात्कालिक निर्णय नसून, पाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक खबरदारीचा उपाय आहे. सोमवारपासून कपातीचे नियोजन करताना शहरातील सर्व १५८ झोनमध्ये समप्रमाणात पाणीपुरवठा केला जाईल. पाणी वाया घालवणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांवर आणि बांधकाम साईट्सवर भरारी पथकांमार्फत कडक कारवाई करण्यात येईल.”– नवल किशोर राम, आयुक्त पुणे मनपा.