फोटो सौजन्य - Social Media
शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. ही भरती पूर्णपणे कंत्राटी स्वरूपात होणार असून इच्छुक उमेदवारांनी 4 सप्टेंबर 2025 ते 13 सप्टेंबर 2025 या कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे.
या भरती प्रक्रियेत एकूण 52 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये खुल्या गटासाठी 33, महिलांसाठी 17 आणि क्रीडा आरक्षणाखाली 2 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹40,000 इतके एकत्रित मानधन दिले जाईल. ही नियुक्ती 31 मे 2026 पर्यंत वैध असेल. म्हणजेच उमेदवारांना जवळपास नऊ महिन्यांसाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. कंत्राटी स्वरूपात असली तरी ही नोकरी उमेदवारांच्या शैक्षणिक अनुभवात मोलाची भर घालणार आहे.
विद्यापीठाने ज्या विभागांत सहाय्यक प्राध्यापकांची मागणी केली आहे त्यात:
या नऊ विभागांमध्ये पात्र उमेदवारांना काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
यापूर्वी जून 2025 मध्ये विद्यापीठाने एकूण 133 पदांसाठी भरतीची जाहिरात केली होती. त्यापैकी 86 नियुक्त्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप शासनमान्य 111 कायमस्वरूपी पदे प्रलंबित असल्याने विद्यापीठाने सध्या कंत्राटी पद्धतीने ही पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेला विद्यार्थ्यांच्या कृती संघर्ष समितीने आक्षेप घेतला होता. जुन्या भरती प्रक्रियेत पारदर्शकतेबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने आता नव्याने 52 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशातील नामांकित व प्रतिष्ठित शैक्षणिक केंद्र मानले जाते. अशा संस्थेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी उमेदवारांसाठी करिअरमध्ये महत्वाची ठरू शकते. मानधन आणि नियुक्तीचा कालावधी निश्चित असला तरी शिक्षण क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासाठी ही भरती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. म्हणूनच इच्छुक उमेदवारांनी निश्चित तारखेपूर्वी अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.