पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर त्यांनी दुमजली उड्डाणपुलाच्या कामांची पाहणी केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक एकात्मिक दुमजली उड्डाणपूल (औंध ते शिवाजीनगर) प्रकल्प
पुणे विद्यापीठ चौकामध्ये तसेच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या निराकरणासह दिर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून यासाठी अंदाजित २७७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता प्राप्त आहे. या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच अस्तित्वातील वाहतुकीस पुरेसा रस्ता उपलब्ध व्हावा, म्हणून या दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे.
या उड्डाणपुलाची एक मार्गिका (औंध -शिवाजीनगर) वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. शिवाजीनगर व औंध बाजूकडील रॅम्पचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित बाणेर व पाषाण बाजूकडील रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पीएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून रहदारीसाठी हा उड्डाणपुल खुला करण्यात आला आहे. परिणामी नागरिकांना या भागातून प्रवास करणे सुकर होणार आहे.
ऑगस्ट २०२२ पासून कामाला सुरुवात
या उड्डाणपुलाच्या आराखड्यास प्राधिकरण सभा, कार्यकारी समिती, पुणे महानगरपालिका व पुणे एकीकृत महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास ऑगस्ट २०२२ पासून प्रारंभ करण्यात आला होता. या कामासाठी शासनाने २६/०५/२०२० रोजीच्या पत्रान्वये मेट्रो सवलतकार कंपनी व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे दरम्यान स्वाक्षांकित करावयाच्या पूरक सवलत करारनामाच्या मसुद्यास मान्यता दिली होती. तत्पूर्वी, अस्तित्वातील दोन एकेरी वाहतुकीचे उड्डाणपूल ऑगस्ट २०२० मध्ये शासनाच्या मान्यतेने पाडण्यात आले होते. यानंतर संबंधित उड्डाणपुलाचे काम सुरु केले होते. मुख्य विद्यापीठ चौकामध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी ५५ मी. लांब स्टील गर्डर बसवण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
अंधत्व मुक्त महाराष्ट्र करणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. शासनामार्फत याबाबत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीसाठी एप्रिल २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासन, वनसाईट एसीलर लक्सोटिका फाउंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात करार करण्यात आला असून आतापर्यंत १९ जिल्ह्यांच्या १८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे.