pune weather rain update Water pooled on the road
पुणे : शहरामध्ये देशभरामध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मागील आठवड्याभरापासून शहरामध्ये पाऊस पडत आहे. दररोज सायंकाळी पडणाऱ्या या पावसामुळे वातावरणामध्ये मोठे बदल होत आहेत. मात्र काल(दि.20) अवकाळी पावसाचा जोर वाढल्यामुळे पुणे शहर पूर्णपणे जलमय झाले होते. दोन तास तुफान पाऊस पडल्यानंतर शहरातील रस्त्यांना नदी-नाल्यांचे स्वरुप आले होते.
पुण्यामध्ये दुपारी तीन वाजल्यापासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. पुणे वेधशाळेने हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पुढील सहा दिवस आकाश ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली होती. सिंहगड रोड, डेक्कन परिसर, बाणेर रस्ता आणि कात्रज चौकामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. वरुन कोसळणारा तुफान पाऊस आणि रस्त्यांवर साचलेले पाणी यामुळे चाकरमान्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जोरदार अवकाळी पावसामुळे शहरामध्ये 50 हून अधिक झाडपडीच्या घटना झाल्या असल्याची माहिती पुणे अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये धानोरी, एरंडवणे, येरवडा, हडपसर, पेठांमधील भाग आणि कोथरुड व कर्वेनगर भागांचा समावेश आहे. झाडप़डीच्या घटनांमध्ये सकाळी 10 पर्यंत 54 घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये 2 ठिकाणी भिंत देखील पडली. धनकवडीमधील तीन हत्ती चौक येथे भिंत पडल्याची घटना घडली. त्याचबरोबर हिंगणे खुर्दमधील अक्षय कॉम्लेक्स येथे देखील भिंत पडल्याची घटना घडली.
पुणे शहरामध्ये अवकाळी पावसामुळे झाडपडीच्या 54 घटना घडल्या आहे (फोटो – टीम नवराष्ट्र)
धानोरीमध्ये होर्डिंग पडल्याची घटना
पुण्यामध्ये अवकाळी पावसामध्ये होर्डिंग पडल्याची घटना देखील घडली आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, धानोरी येथील पोरवाल रोड येथे होर्डिंग पडल्याची घटना घडली. मुसळधार पावसामुळे जाहिरातबाजी करणारे लोखंडी होर्डिंग पडले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झालेले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्त्यांवर पडलेले होर्डिंग बाजूला सारले. रस्त्यांवर पडलेला राडारोडा बाजूल्या केल्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली.
पुण्यामध्ये मुसळधार पावसानंतर धानोरी मध्ये होर्डिंग पडल्याची घटना घडली (फोटो – टीम नवराष्ट्र)
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यामध्ये तुफान वादळी पाऊस पडल्यानंतर पालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छतेचे काम केल्यानंतर देखील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले होते. रस्त्यांना नदीचे स्वरुप मिळाले होते. यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. कात्रज चौकामध्ये देखील अशीच जलमय परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये रस्त्यांवरील खड्डे देखील दिसून येत नव्हते. येरवडा आणि कल्याणी नगर भागात रस्त्यावर पाण्याचे डबके साचल्याचे जागोजागी दिसून आले आहे. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. वाहनचालक अतिशय धोकादायक पद्धतीने वाहन चालवत असल्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता होती. रस्त्यांवर उभी केलेली वाहने देखील पावसाच्या जोरामुळे वाहून गेली. त्यामुळे या वादळी पावसाने पुणेकरांना झोडपले असून यामध्ये अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.