
पुणेकरांनो, HSRP नंबर प्लेट अजूनही बसवली नाही तर आता कारवाई अटळ; पहिल्याच दिवशी केलेल्या कारवाईत...
पुणे : उच्च सुरक्षा नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवण्याची अंतिम मुदत ३० जून रोजी संपल्याने, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) १ जुलैपासून विना-एचएसआरपी वाहनांविरुद्ध कडक मोहीम हाती घेतली आहे. कारवाईच्या पहिल्याच दिवशी आरटीओने २६१ वाहनांची तपासणी केली, ज्यामध्ये एचएसआरपी नंबर प्लेट न बसवणाऱ्या ७५ वाहनचालकांना प्रत्येकी १ हजार रुपयांचा ऑनलाईन दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी दंड झालेल्या एकाही वाहनचालकाने अद्याप दंडाची रक्कम जमा केलेली नाही.
पुणे विभागातील वाहनचालकांकडून अद्यापही या मोहिमेला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. पुणे विभागात सुमारे २५ लाख वाहनांना ही नवीन नंबरप्लेट बसवणे आवश्यक आहे. आतापर्यंत साडे अकरा लाख वाहनांनी नोंदणी केली आहे. केवळ ९ लाख ४४ हजार वाहनांवर एचएसआरपी बसवण्यात आली आहे. तब्बल १३ लाखांहून अधिक वाहनांना अद्याप नंबरप्लेट बसवणे बाकी आहे.
WhatsApp नंतर आता सरकारची Telegram वर नजर; या कारणांसाठी पाठवली नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
२०२५-२६ या आर्थिक वर्षात आरटीओकडून १ हजार १८९ वाहनांची तपासणी करण्यात आली होती, ज्यामध्ये ४२६ वाहने दोषी आढळली होती. आतापर्यंतची एकूण आकडेवारी पाहिल्यास, आरटीओने एकूण १ हजार ४५० वाहनांची तपासणी केली असून, त्यात ५०१ वाहने दोषी आढळली आहेत. या सर्व दोषी वाहनांवर प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
मुदतवाढ संपली, आता थेट कारवाई
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्यात २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवणेबंधनकारक करण्यात आले आहे. जानेवारी २०२५ पासून या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. परिवहन विभागाने यापूर्वी ३० एप्रिल, ३० जून, १५ ऑगस्ट, ३० नोव्हेंबर आणि ३१ डिसेंबर अशी अनेकदा मुदतवाढ दिली होती. मात्र, प्रशासनाच्या वारंवारच्या इशाऱ्यांनंतरही वाहनचालकांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता आरटीओने थेट दंडात्मक कारवाईचे हत्यार उपसले आहे. येत्या दिवसांत ही कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
यापुढेही कारवाई राहणार सुरुच
एचएसआरपी नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनांवर यापुढेही आरटीओची ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. वाहनचालकांनी लवकरात लवकर नंबरप्लेट बदलून घ्यावी.
– संदीप खडसे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.