
दिलेला शब्द 24 तासात पूर्ण; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सोडविली
निवडणुकीदरम्यान या इमारतीतील रहिवाशांनी कचऱ्याची गंभीर समस्या बाप्पु मानकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. ही समस्या निवडणुकीनंतर प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले होते. त्या अनुषंगाने काल त्यांनी प्रत्यक्ष सोसायटीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून संपूर्ण इमारतीत कचरा टाकण्याची जागा बंद करण्यासाठी जाळ्या लावण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, निर्णय झाल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील करण्यात आली आहे. या कामाची पाहणी करून, समस्या पूर्णपणे सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याचा शब्द बाप्पु मानकर यांनी नागरिकांना दिला आहे.
या सोसायटीतील डक्टमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साठत असल्याने दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला होता, ज्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. वारंवार स्वच्छता करूनही पुन्हा कचरा साठत असल्याने प्रत्येक मजल्यावर जाळ्या लावण्याची उपाययोजना करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : सायलेंट बिडकर विरुद्ध आक्रमक धंगेकर; पुणे महापालिकेत रंगलेली हायव्होल्टेज लढत
सर्वप्रथम डक्टच्या संपूर्ण भागाची स्वच्छता करून घेण्यात आली असून, इमारतीतील ९ मजल्यांवर ६०० हून अधिक जाळ्या बसवल्या जाणार आहेत. याचसोबत नागरिकांना डस्टबिनचे वाटप करून, ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृतीही केली जाणार आहे. दिलेल्या शब्दाची त्वरित पूर्तता केल्याबद्दल रहिवाशांनी राघवेंद्र बाप्पु मानकर यांचे आभार मानले. यावेळी हिराबाग सोसायटीमधील शंकर तावरे, सचिन मुजुमले, संदीप गायकवाड, संतोष वाटमकर, पांडुरंग जावळकर, दत्ता इंगळे यांसह सोसायटीतील सदस्य व रहिवासी उपस्थित होते.
मानकर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
पुण्यासह राज्यातील २८ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी शुक्रवारी जाहीर झाली. यामध्ये राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवत पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक २५-ब येथून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर हे तब्बल २६ हजार ४९७ मतांच्या फरकाने विजयी ठरले आहेत. भाजपाच्या माध्यमातून त्यांनी ही निवडणूक लढवली होती. राज्यातील महापालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसून आले. पुणे महानगरपालिकेत १२० हून अधिक जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे.