राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक भागांत विजांसह पाऊस होणार
पुणे : गेल्या काही दिवसांपासून बदलत्या वातावरणाचा सामना नागरिकांना करावा लागत होता. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. त्यातच आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून आता दिलासा मिळत आहे. राज्यात परतीच्या पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी काही ठिकाणी हजेरी लावत आहेत. परंतु सर्वदूर पावसाची सरी हजेरी लावत नाहीत. त्यामुळे अनेक भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पुणे, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे.
राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सांगली, पुणे, पुणे घाटमाथा, नाशिक, नाशिक घाटमाथा, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर सातारा, सातारा घाटमाथा, रायगड, सोलापूर, लातूर, नांदेड आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
दरम्यान, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाजही आहे. पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत हलक्या सरींचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
काय आहे पावसाचा अंदाज?
कोकण आणि गोव्यात २२ ते २७ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २२ आणि २३ सप्टेंबर, तर मराठवाड्यात २३ सप्टेंबर रोजी मध्यम ते व्यापक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान, तर मराठवाड्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विजांचा कडकडाटही होणार?
काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि पावसाच्या काळात सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.






