
व्हीआयपींच्या वाढत्या दौऱ्यांमुळे पुणे पोलिसांची दमछाक! गुन्हे शाखाही बंदोबस्तात
पुणे : मेट्रोसिटी अन् आयटी हबसोबतच मुंबईनंतर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे शहर असलेल्या पुण्यात ‘व्हीआयपी’चे वाढते दौरे पुणे पोलिस यंत्रणेवर ताण निर्माण करत आहेत. विशेषत: गेल्या काही वर्षांत या व्हीआयपींना अनोखे महत्व प्राप्त झाल्याचे काही वरिष्ठ अधिकारी खासगीत बोलतात. पण, व्हीआयपींच्या सुरक्षेसोबत पोलिस शहराची सुरक्षा व्यवस्थापन अभेद्य ठेवत आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच झेड प्लस, झेड, वाय प्लस आणि वाय श्रेणीतील व्यक्तींच्या भेटींमध्ये गेल्या तीन वर्षांत लक्षणीय वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. २०२५ मध्ये हा आकडा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.
पुण्याचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. आयटी हब, शिक्षणाचे माहेर घर, मेट्रोसिटीसोबतच राजकीय, औद्योगिकीकरणात पुणे केंद्रस्थानी राहिले जात आहे. मुंबईनंतर पुण्याकडे पाहिले जाते. देशाच लक्ष पुण्याकडे आहे. आपसूकच मग व्हीआयपींचेही दौरे वाढले आहेत. पण, या व्हीआयपींच्या दौऱ्यांमुळे पोलिस यंत्रणेवरचा ताण दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे दिसत आहे. एखादा महत्वाचा व्यक्ती आल्यानंतर पोलिस दल त्याच्या दिमतीखातर दिवसभर तैनात राहत. परिणामी, कामकाजाला तितकासा वेळ देता येत नाही.
आकडेवारी पाहता, २०२३ मध्ये मर्यादित असलेल्या व्हीआयपी भेटींमध्ये २०२४ पासून वाढ झाली आहे. २०२५ मध्ये ती उच्चांकावर गेली. विशेष म्हणजे, २०२५ मध्ये राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या भेटी झाल्या नाही. पण, झेड प्लस (३३४), झेड (९८) व वाय प्लस (९६९) श्रेणीतील भेटींमध्ये मोठी वाढ झाली. यावरून शहरात उच्चस्तरीय व्यक्तींची उपस्थिती सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होते. २०२४ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात नेत्यांचे दौरे झाले होते. मात्र, निवडणुका नसताना २०२५ मध्ये व्हीआयपी भेटींमध्ये झालेली वाढ ही अधिक लक्षवेधी ठरते.
पुणे शहरात सध्या तीन मंत्री आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (वाय सुरक्षा) आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (वाय प्लस सुरक्षा), माधुरी मिसार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम असल्यानंतर पोलिसांना चोख सुरक्षा पार पाडावी लागते. सुरक्षेसोबतच पोलिसांना त्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये, याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. अतिवरिष्ठांच्या देखरेखीखाली होणाऱ्या या सुरक्षा यशस्वी पार पडते.
गुन्हे शाखाही बंदोबस्तात
राज्यातील राजकीय स्थितीत गेल्या काही वर्षात मोठा बदल झाला आहे. अचानक होणारे आंदोलन, शाई फेक, काळे झेंडे दाखवणे अशा घटना घडत असल्याने व्हीआयपींच्या सुरक्षेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पुर्वी गुन्हे शाखेला व्हीआयपींचा बंदोबस्त दिला जात नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांत गुन्हे शाखेला या सुरक्षेत महत्वाची जबाबदारी दिली जाते. दिवसभर हे गुन्हे शाखा व्हीआयपींच्या दिमतीत असते. पुर्वी काही कर्मचाऱ्यांमध्ये होणारा बंदोबस्त आता शेकडो कर्मचारी आणि अधिकारी यांच्या उपस्थित पार पडत असल्याचे वास्तव आहे.
बंदोबस्त शाखा एक पर्याय
पुण्याचा विस्तार झपाट्याने होत आहे. शहरात ४४ पोलिस ठाणी आहेत. उपनगरांपासून आता पुणे पोलिस आयुक्तालयाची हद्द ही काही किलोमीटरपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर पुणे शहरात देखील व्हीआयपींसाठी वेगळी बंदोबस्त शाखा असावी, असे मत काही जाणकर अधिकारी करतात.