
नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटील पुन्हा सक्रिय; वळसे पाटीलांशी वाढता समन्वय
आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या आढळराव पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. रोजगाराच्या शोधात मुंबई गाठल्यानंतर संगणक क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एकेकाळी बेरोजगारीचा सामना केलेल्या आढळराव पाटील यांनी उद्योगाच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या आढळराव पाटील यांच्या कार्यतत्परतेची चर्चा उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातही होत असते.
सन १९९० मध्ये दिलीप वळसे पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर दोघांची ओळख झाली. पुढे ती जिव्हाळ्याच्या मैत्रीत रूपांतरित झाली. त्यानंतर वळसे पाटील यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. पुढे २००४ मध्ये खेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने आढळराव पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेना पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय संपादन केला. त्यानंतर त्यांनी सलग तीन वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करत मतदारसंघात आपला ठसा उमटवला.
विविध सार्वजनिक कार्यक्रमांत सहभाग
२०१९ मध्ये मात्र त्यांना विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. २०२४ च्या निवडणुकीतही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही आढळराव पाटील यांनी मतदारसंघातील जनसंपर्क कायम ठेवत विविध सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांत सहभाग घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही त्यांनी सक्रिय भूमिका बजावल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जाते. दरम्यान, विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघातील उपस्थितीबाबत काही ठिकाणी चर्चा रंगू लागली आहे. विविध कार्यक्रमांत त्यांची उपस्थिती कमी असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होत असल्याचे सांगितले जाते.
हे सुद्धा वाचा : बालगंधर्व रंगमंदिरांचा पुनर्विकास होणार; महापालिका तब्बल 185 काेटी रुपये खर्च करणार
शिरूर मतदारसंघात हालचालींना वेग
या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्राथमिक स्तरावर रणनीती आखण्याबाबत हालचाली सुरू झाल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे. या संदर्भात देवेंद्र शहा (शरद बँकेचे अध्यक्ष) आणि बाळासाहेब बेंडे (भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष) यांच्यासह काही स्थानिक नेत्यांमध्ये चर्चाही सुरू असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीस अजून काही वर्षांचा कालावधी असला तरी शिरूर मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग येत आहे. पुढील काळात या समीकरणांना कोणते वळण मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.