
भोसरी परिसरात विजयाचा गुलाल; ढोल-ताशांच्या गजरात अन् दुचाकी रॅलीने परिसर दणाणला
दोन केंद्रांवर रंगली निकालाची उत्सुकता
भोसरीतील निवडणुकीसाठी दोन मुख्य ठिकाणी मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली होती. प्रभाग क्रमांक ३, ४, ५ व ७ ची मतमोजणी भोसरी गावठाणातील बापुजी बुवा चौक येथील कबड्डी प्रशिक्षण केंद्रात पार पडली. तर, प्रभाग क्रमांक २, ६, ८ आणि ९ ची मतमोजणी इंद्रायणीनगरातील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात पार पडली. सकाळी ८ वाजेपासूनच या दोन्ही केंद्रांच्या बाहेर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. प्रा. रामकृष्ण मोरे कमान परिसर तर कार्यकर्त्यांच्या गर्दीने पूर्णतः ओसंडून वाहत होता.
दुपारनंतर उत्साहाचे वातावरण
सकाळच्या सत्रात निकालांची धाकधूक होती, मात्र दुपारी दोननंतर जसजसे विजयाचे आकडे स्पष्ट होऊ लागले, तसा कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि जल्लोषाला सुरुवात झाली. विजयाचे अधिकृत प्रमाणपत्र घेण्यासाठी उमेदवार जेव्हा केंद्राबाहेर आले, तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून धरले. “कोण आला रे कोण आला…” आणि पक्षांच्या जयघोषाने परिसर निनादला. भंडाऱ्याची उधळण आणि गुलालाच्या रंगात कार्यकर्त्यांचे चेहरे न्हाऊन निघाले होते.
बुलेट रॅली आणि ‘साऊंड’चा धडाका
विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली होती. शेकडो दुचाकींच्या रॅलीने भोसरीतील मुख्य रस्ते व्यापले होते. विशेषतः बुलेट गाड्यांच्या फटाक्यांच्या आवाजाने आणि सायलेन्सरच्या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हातात पक्षाचे झेंडे घेऊन निघालेल्या या रॅलीमुळे काही काळ वाहतुकीची संथ गती झाली होती.
हे सुद्धा वाचा : पुण्यात भाजपने शतक ठाेकले, राष्ट्रवादीला धाेबीपछाड; ‘हे’ दिग्गज नेते पराभूत
राजकीय सलोखा आणि रंगांची उधळण
बापूजी बुवा चौकात एकीकडे भाजप तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. दोन्ही बाजूंनी विजयाचा जल्लोष सुरू होता. मात्र, कोणताही वाद न घालता दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी आपापल्या उमेदवारांच्या विजयाच्या घोषणा देत मिरवणुका पुढे नेल्या. पिवळा, भगवा आणि गुलाबी अशा विविध रंगांच्या उधळणीमुळे भोसरीचा परिसर अक्षरशः रंगीबेरंगी झाला होता.